मालेगाव – मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद (Eid) सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल मालेगाव शहरात प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून मुस्लिम बांधवांना आता रमजान ईदचे वेध लागले आहे. रमजान ईदची सामुदायिक नमाज (Namaz) पठणासाठी मालेगावच्या ईदगाह मैदानावर लाखो मुस्लिम बांधव नमाज एकत्र जमतात. गेली दोन वर्षे कोरोनाच्या (Corona) निर्बंधामुळे सामुदायिक नमाज पठण होऊ शकले नाही. यंदा मात्र निर्बंध शिथिल झाल्याने मुस्लिम बांधवामध्ये मोठा उत्साह असून,सर्वांना रमजान ईदचे वेध लागले आहेत.
लाखो मुस्लिम बांधव सामुदायिक नमाज पठणासाठी एकत्र येणार आहेत. प्रशासनाच्य वतीने सामुदायीक नमाज पठणाला परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाच्यावतीने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. महसूल, महापालिका व पोलिस प्रशासनाने तयारीची संयुक्त पाहणी केली आहे. महापालिका प्रशासानाकडून इदगाह मैदानाची स्वच्छता करण्यात आली. तर नमाजसाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रमजान काळात कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे.
समाज विघातक कृत्य करणाऱ्या 94 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर राज्य राखीव व दंगा नियंत्रण पथकाच्या प्रत्येकी दोन तुकड्या तसेच बाहेरून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. 1 हजार कर्मचारी व 60 अधिकारी तैनात करण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. सोशल मिडियावर लक्ष ठेवण्यात येत आहे. सकाळी साडे आठ वाजता मुख्य इदगाह मैदानावर नमाज पठण केले जाणार असून नागरिकांनी शांततेत व उत्साहात रमजान ईद साजरी करावी असे आवाहन मुस्लिम धर्मगुरू व पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी सांगितली.