जळगाव | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर केल्या जाणार आहेत. मात्र त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित केले आहेत. भाजपनेही महाराष्ट्रातील 20 जागांसाठीचे उमेदवार घोषित केले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांची रावेरमधील ही तिसरी टर्म असणार आहे. याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे इच्छुक होते. त्यामुळे या मतदारसंघात सुनेविरुद्ध सासरा असा सामना रंगणार असल्याचं चित्र होतं. मात्र, रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित होताच एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे रावेरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. रावेर लोकसभा मतदार संघात मी किंवा रोहिणी खडसे निवडणूक लढणार नाही. रावेर हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास राष्ट्रवादीतील सहा ते सात जण इच्छुक आहेत. पण मी माझ्या तब्येतीमुळे निवडणूक लढणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचं कालपरवा पर्यंत सांगणाऱ्या नाथाभाऊंनी अचानक यूटर्न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मात्र, रावेरचा सामना चुरशीचा होणार असल्याचा दावा नाथाभाऊंनी केला आहे. उद्या रावेरचा सामना चुरशीचा होईल. आमचाच उमेदवार विजयी होईल, असं सांगतानाच गिरीश महाजन यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही, असं नाथाभाऊ म्हणाले. तसेच महायुतीच्या बाजूने निवडणूक सर्वे आहे असा कोण बोलतंय? अनेक सर्वे हे महाविकास आघाडीच्या बाजूने देखील आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरही बोलण्यास त्यांनी नकार दिला. ही गोष्ट न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, रोहिणी खडसे यांनीही मीडियाशी संवाद साधला. आमच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची आज पवार साहेबांनी बैठक घेतली. रावेरमधून कोणता उमेदवार द्यायचा यावर लवकरच निर्णय होईल. प्रत्येकाची लढायची तयारी असते. मी विधानसभेची तयारी करत आहेत. कोणत्या निवडणुकीत कुणाला उभं करायचं हे पक्ष ठरवत असतो. तुम्हाला प्रत्येकाला एकनाथ खडसे यांच्या तब्येतीची माहिती आहेच. ते खूप आजारी होते. त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळेच ते लढण्यास इच्छुक नाहीत, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.