नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भर पावसातली ऐतिहासिक सभा कुणीही विसरू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अनेक कार्यकर्त्यांना या सभेची काल पुन्हा एकदा आठवण झाली. निमित्त होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी घेतलेल्या बैठकीचं. सत्ताधारी शिंदे-भाजपविरोधात महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्हा पक्ष सज्ज झालेत. तसेच आपापल्या पक्षाचं संघटन अधिक मजबूत करण्यावरही भर दिला जातोय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही मोठी मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रवादी पुन्हा.. वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. मंगळवारी रात्री या दौऱ्यात घडलेली घटना सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे. रात्री 11 वाजता ही बैठक सुरु असताना अचानक वीज गुल्ल झाली. मात्र ना जयंत पाटील बोलायचं थांबले ना कार्यकर्त्यांनी जागा सोडली. मोबाइलच्या टॉर्च सुरु झाल्या अन् ही बैठक अखंडपणे पार पडली.
‘राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा’ या दौऱ्याचा मंगळवारी तिसरा दिवस होता. सकाळच्या सत्रात जळगाव केल्यानंतर नाशिक जिल्हयातील चांदवड विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. मंगळवारी रात्री अकरा वाजता चांदवड विधानसभा मतदारसंघाची बैठक सुरू असतानाच अचानक वीज गायब झाली मात्र वीज येईल याची वाट न बघताच जयंतराव पाटील यांनी मोबाईल बॅटरीच्या उजेडात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जयंतराव पाटील यांनी मोबाईल बॅटरी सुरू करताच संपूर्ण सभागृहात मोबाईल बॅटरीचा उजेड करुन पक्षाप्रती व जयंतराव पाटील यांच्या पक्ष वाढीच्या मेहनतीला कार्यकर्त्यांनी दाद दिली.
संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत. या सभांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. शिंदे-भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. कोर्टाच्या निकालात जर १६ शिवसेना आमदार अपात्र ठरले तर हे सरकार बेकायदेशीर ठेरले. त्यामुळे शिंदे-भाजप सरकारला पायउतार होण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असं वक्त्वय जयंत पाटील यांनी केलंय.
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरूनही जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. भाजपने राजकारणाचा स्तर अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन ठेवलाय, अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.