“भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी,या गद्दारांबरोबर जायला नको होतं”; बच्चू कडू यांना शेतकऱ्याने सुनावलं..

| Updated on: Mar 09, 2023 | 10:49 PM

शेतकऱ्यानी स्पष्टपणे आपली भूमिका मांडल्यानंतर बच्चू कडू यांनीही त्या शेतकऱ्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उदाहरण देत गद्दार आमदारांच्या विषयाला त्यांनी बगल दिली.

भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी,या गद्दारांबरोबर जायला नको होतं; बच्चू कडू यांना शेतकऱ्याने सुनावलं..
Follow us on

निफाड/नाशिक: राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची अवस्था दयनीय झाली आहे. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने राज्यातील नाशिक, अहमदनगर, जळगाव अशा अनेक भागातील शेतकऱ्यांनी उभा पिकावर आता नांगर फिरवला आहे. त्यानंतर आता जनसामान्यांचा, शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील नैताळे येथील शेतकऱ्याची भेट घेतली. निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला आपल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळाला नाही म्हणून त्यांनी आपल्या कांदा पिकावर रोटर फिरवला होता.

ही घटना आमदार बच्चू कडू यांना समजताच त्यांनी शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी ते नैताळे येथे आले होते. मात्र बच्चू कडू येताच शेतकऱ्यांनीही आपल्या मनातील भावना त्यांच्याजवळ बोलून दाखवल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ महिन्यापूर्वी बंडखोरी करून मुंबई-सूरत-गुवाहटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करून त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन कित्येक दिवस झाले तरीही अजून आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळेही आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि ती नाराजी अनेकदा त्यांच्यासमोर बोलूनही त्यांनी दाखवली आहे.

यावेळी तसाच प्रसंग समोर आला आणि त्याला आमदार बच्चू कडू यांनाही सामोरं जावं लागलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी म्हणून बच्चू कडू नाशिक जिल्ह्यातील नैताळे गावी आले होते.

मात्र यावेळी शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका मान्य नसल्याने त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. यावेळी शेतकरी बच्चू कडू यांना म्हणाले की, “भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात मात्र या गद्दारांबरोबर तुम्ही जायला नको होत” अशा स्पष्ट शब्दात बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध दर्शविला.

यावेळी शेतकऱ्यानी स्पष्टपणे आपली भूमिका मांडल्यानंतर बच्चू कडू यांनीही त्या शेतकऱ्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उदाहरण देत गद्दार आमदारांच्या विषयाला त्यांनी बगल दिली.