निफाड/ नाशिक : राज्यात झालेल्या अवकाळी आणि झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने आता आम्ही जगायचं कसं असा सवाल शेतकरी करू लागले आहेत. ऐन रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसाने धूमाकूळ घातल्यामुळे आणि दुसरीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उभा पिकावर नांगर फिरवला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने आता जगायचं कसा असा सवाल शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांचे मोबाईलवरील संवाद व्हायरल झाले होते. त्यावेळेपासून आमदार शहाजी बापू पाटील प्रचंड चर्चेत आले आहेत. आता त्यांचा मोबाईलवरील डायलॉग चर्चेत आला आहे तो मात्र शेतकऱ्यांच्या आर्त स्वराने.
यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याच स्वरात स्वर मिसळून एका शेतकऱ्याने आमदार पाटील यांना सवाल उपस्थित केला आहे.
गुवाहाटीला जाऊन काय झाडी, काय डोंगर म्हणणारे शहाजी बापू पाटील यांनी आता गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांची काय अवस्था आहे ते इथे येऊन पाहावं. काय द्राक्ष बागा, काय कांद्याच्या पाती, आमचं समदं कसं निसर्गानं ओके केलं आहे, हे येऊन पाहावं अशा आर्त स्वरात शेतकऱ्यांनी त्यांना सवाल उपस्थित केला आहे.
निफाड तालुक्यातील कुंभारी येथील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक रमेश नामदेव शेजवळ यांनी शहाजी पाटील यांना आपली व्यथा सांगितली आहे.
आमच्या नुकसानीची पाहणी करायला कृषी मंत्री सत्तार येणार आहेत. पण ते आम्हाला काय देणार आहे. आमच्या नुकसान झालेल्या कांद्यावर आता रोटरी मारण्याची वेळ आलेली आहे.
हीच अवस्था सगळ्या शेतकऱ्यांची झाली असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. लाल कांद्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर कुंभारी येथील रमेश शेजवळ यांनी उन्हाळ कांद्याची 1 एकर लागवड केली होती.
शनिवारी झालेल्या गारपिटीने कांदा पात पूर्णतः आडवी झाल्याने या कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावेळी आपली भावना व्यक्त करताना त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्याकडे बोट करून आमच्या व्यथा जाणून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.