भुजबळ-कांदे वादानंतर आता आणखी दोन बडे नेते आमनेसामने, नाशिकमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद विकोपाला

| Updated on: Oct 08, 2021 | 8:18 PM

राष्ट्रवादीच्या दोन नव्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमच्या काळात झालेल्या कामाचे श्रेय घेऊ नका असे म्हणत शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीचे आमदार सरोज आहेर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

भुजबळ-कांदे वादानंतर आता आणखी दोन बडे नेते आमनेसामने, नाशिकमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद विकोपाला
NCP SHIVSENA
Follow us on

नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेली कुरबूर चर्चेचा विषय ठरली आहे. मंत्री छगन भुजबळ तसेच शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात झालेला भर सभेतील वाद चांगलाच गाजला होता. तसे कांदे यांनी भुजबळ यांच्यावर केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली होती. आता हा वाद संपत नाही तोच शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या दोन नवे नेते आमनेसामने आले आहेत. आमच्या काळात झालेल्या कामाचे श्रेय घेऊ नका असे म्हणत शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीचे आमदार सरोज आहेर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आमच्या काळात झालेल्या कामांचे श्रेय घेऊ नका

महाविकास आघाडीतील आणखी एक नाराजीनाट्य समोर आले आहे. शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार सरोज आहेर यांच्यावर आरोप केले आहेत. आमच्या काळात झालेल्या कामांचे श्रेय घेऊ नका असे माजी आमदार योगेश घोलप  सरोज आहेर यांना उद्देशून म्हणाले आहेत. देवळाली मतदारसंघातील विकासकामाच्या संदर्भाने त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

उद्घाटन कार्यक्रमानंतर योगेश घोलप आक्रमक

नाशिक जिल्ह्यातील देवळाली या मतदारसंघात काही विकासकामांच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला होता. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सरोज आहेर यांनी केले होते. याच उद्घाटन कार्यक्रमानंतर योगेश घोलप आक्रमक झाले आहेत. त्यांनी हे काम माझ्या कारकिर्दीत झाले आहे, असा दावा केला. तसेच कामांचे श्रेय घेण्याचे आहेर यांनी थांबवावे अशी खोचक टिप्पणी घोलप यांनी केली आहे.

छगन भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले?

काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात चांगलाच वाद झाला होता. त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली होती. भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाल कांदे यांनी 30 सप्टेंबर रोजी केला होता. तसेच भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचं वाटप केलं. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी भुजबळ आणि कांदे यांच्यात भर सभेत जोरदार खडाजंगी झाली होती.

महाविकास आघाडीत बिघाडी ?

राज्यात जरी तीन पक्षांचं सरकार असलं तरी नाशिकध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसतंय. या ना त्या कारणावरुन या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना ? असा प्रश्न विचारला जातोय.

इतर बातम्या :

सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आलीय, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन राजकारण पेटणार? राणेंच्या टीकेला अरविंद सावंतांचं प्रत्युत्तर

एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ‘हाती’; आता रतन टाटा म्हणतात…

(Former Shiv Sena MLA Yogesh Gholap has slammed NCP MLA Saroj Ahire on development project credit)