नाशिक : ठाण्यानंतर आता नाशिकमध्ये श्रेय लाटण्यावरुन चढाओढ सुरू झाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात आता रस्ते उद्घाटनावरून श्रेयवादाची स्पर्धा पाहायला मिळत आहे. एकाच रस्त्याचं चार दिवसांत दोनदा उद्घाटन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामणी ते बोराचिवडी हा रस्ता राज्यसरकारच्या निधीतून मंजूर झाला आहे. पण रस्त्याच श्रेय लाटण्यासाठी आता चढाओढ पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंब्रा येथील एका पूलाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आमने सामने पाहायला मिळाले होते. असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पाहायला मिळाला आहे.
सिन्नर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी इगतपुरी तालुक्यातील धामणी ते बोराचिवडी या रस्त्याचा भूमीपूजन सोहळा 8 नोव्हेंबरला केला.
कोकाटे यांनी रात्री उशीरा घाईघाईने मोबाईलच्या टॉर्चमध्ये उरकुन घेतला होता, या उद्घाटनाची चर्चा मात्र संपूर्ण मतदार संघात झाली.
या उद्घाटनाची चर्चा होत असतांना मात्र नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील चारच दिवसात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्याच रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला उद्घाटनाचा कार्यक्रम केला.
रस्ता मंजुरीच्या फलक लावून श्रेयावर दावा केला आहे. एकाच रस्त्याच चार दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी उद्घाटन केल्यामुळे परिसरात दोन्ही उद्घाटन फलक चर्चेचा विषय झाला आहे.
इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यात अनेक वर्षांपासून कित्येक गावाना रस्त्याच नाहीये तर अनेक ठिकाणी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे.
त्यामुळे उद्घाटन नाट्य हे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केल्याची चर्चा मतदार संघात आहे, मात्र तुम्ही दररोज उद्घाटन करा पण रस्ते करा अशी उपरोधिक चर्चा देखील होऊ लागली आहे.