मालेगाव – शिक्षक (Teacher) नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणारे कृत्य कायमच निषेधार्थ आहे आणि राहील.अन्यायाच्या विरोधात लढा व चांगल्या गोष्टींना समर्थन देण्याचे धडे देणारे गुरुजींच जेव्हा विद्यार्थ्यांवर “आर्थिक अन्याय”करून त्यांच्या हक्काचा “शिष्यवृत्ती”चा (Scholarship) पैसा लुटतात तेव्हा गावाला जागे व्हावे लागते,याचेच उत्तम उदाहरण मालेगांव (Malegaon) तालुक्यातील सोनज येथे बघायला मिळाले आहे. सोनज येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिळणारी “सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती” चा लाभ गेल्या दोन तीन वर्षांपासून मिळत नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या लक्ष्यात आल्याने मोठा आर्थिक घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे मुख्याध्यापिका व सहकारी शिक्षक यांना निलंबनच्या कार्यवाहीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
मालेगाव तालुक्यातील सोनज येथील प्राथमिक शाळेत एस.टी.प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर वर्षी शासन निर्णयानुसार “सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती” शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र आपल्या गावातील मुलांना मागील दोन तीन वर्षांपासून(2018 ते 2020) या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसून विद्यार्थी या पासून वंचित राहिले आहेत. शिष्यवृत्ती पैश्याचा अपहार झाल्याची उकल शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण बच्छाव यांना सप्टेंबर 2021 किर्द खतावणी बघतांना, खोट्या स्वाक्षऱ्या केल्याच्यावरून निदर्शनास आले. मुख्याध्यापिका विमल सूर्यवंशी व सहकारी शिक्षक वामन नामदेव सूर्यवंशी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे प्रवीण बच्छाव यांचा संशय बळावला.
तात्काळ प्रवीण बच्छाव यांनी माजी उपसरपंच साहेबराव बच्छाव व विद्यमान उपसरपंच राजेंद्र अहिरे, सदस्य नलिनी बच्छाव यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत, त्यांच्या माध्यमातून सोनज ग्रामपंचायतीला याबाबत दखल घेण्यास भाग पाडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मालेगांव मार्केट कमिटीचे सदस्य व गावातील जाणकार संग्राम बच्छाव,साहेबराव बच्छाव यांनी पुढाकार घेत तडीस नेत. संबंधित आर्थिक घोटाळा प्रकरण गट शिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे व केंद्रप्रमुख संजय मांडवडे यांच्या दरबारी हजर केले.
गट शिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे व केंद्रप्रमुख संजय मांडवडे यांनी तात्काळ सोनज जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व संबंधित शिक्षक-मुख्याध्यापिका यांची मिटिंग घेतली. नेमके हे प्रकरण काय आहे? असा जाब विचारला असता संबंधित शिक्षकाने घोटाळा झाल्याची कबुली दिली. तसेच स्वतः च्या आईच्या नावाने धनादेशाद्वारे तीनदा वीस-वीस हजार तर एक वेळा एकतीस हजार रुपये काढले असल्याचे समजले. गट शिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण काम करत अगोदरच शाळेच्या बँक खात्याचे स्टेटमेंट काढून जवळ ठेवत अपहार झाल्याचे निदर्शनास आणून दिल्याने संबंधित मुख्याध्यापिका शिक्षक यांना घोटाळा कबूल करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
संबंधितांनी सर्व प्रकरण उघड झाल्याने, पुन्हा सर्व रक्कम परस्पर शाळेच्या खात्यावर जमा करत “आर्थिक घोटाळ्याला” शिक्कामोर्तब केले. याबाबत मुख्याध्यापिका विमालबाई सूर्यवंशी यांनी आपण अपंग असल्याने वामन सूर्यवंशी यांच्यावर अंधविश्वास ठेवत शिष्यवृत्ती कारभार दिला होता असे सांगितले आहे. त्यानंतर हे प्रकरण मालेगांव गट विकास अधिकारी यांच्या दरबारी दाखल झाले. गट विकास अधिकारी यांनी मालेगांव पंचायत समिती येथे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांची बैठक घेतली. यावेळी पाच ते सहा ग्रामपंचायत सदस्य उपस्थिती होते. त्यांनी सविस्तरपणे प्रकरण समजून सांगितले. त्यात गट विकास अधिकारी यांनी संबंधित प्रकरण नाशिक जिल्हा परिषदला पाठवण्याचे सांगून, संबंधितांवर तीन प्रकारची कार्यवाही होऊ शकते असे सांगितले. त्यात कायमस्वरूपी मूळपगारावर ठेवणे, दोन-तीन वेतनवाढ थांबवणे व निलंबित करणे असे पर्याय सुचविले असता ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ निलंबनच्या कारवाई वर ठाम राहिले.
या प्रकारानंतर दीड महिना होऊनही कारवाई होत नसल्याने गाव पातळीवर उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. चौकाचौकात हीच चर्चा रंगू लागल्याने सोनज ग्रामपंचायतीने सरळ “कळवण प्रकल्प” यांनाच निष्पक्ष चौकशी निवेदन दिले. यानंतर आयुक्त मीना साहेब “ऍक्शन मोड” मध्ये येत नाशिक जी.प.व मंडळ पदाधिकारी(सी.ओ) साहेब यांना संबंधित प्रकरणाबाबत”संबंधित दोषी शिक्षकांवर योग्य ती कारवाई करावी” असे पत्र पाठविले. मंडळ पदाधिकारी(सी.ओ) यांनी तात्काळ दोषी शिक्षकांवर निलंबनच्या कारवाईचे आदेश देत,संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे देखील मंडळ पदाधिकारी(सी.ओ) यांच्या कडून गट शिक्षणाधिकारी यांना प्राप्त झाले आहे असे सूत्रांकडून समजले आहे.
दोषी शिक्षक वामन सूर्यवंशी यांनी निलंबन कारवाई नंतर राहत असलेल्या परिसरात आपली बढती झाली असल्याची बतावणी लावल्याचे अनेक शिक्षक बांधवांनी सांगितले आहे. वामन सूर्यवंशी हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून सोनज येथे कार्यरत आहेत.त्यापूर्वी ते वस्तीशाळा येथे कार्यरत होते. समायोजन अंतर्गत सोनज जि. प.शाळेत दाखल झाले. तसेच कामाबद्दल अतिशय बेजबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.