नाशिकः युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात परतून वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विद्यापीठाने (Health University) मोफत ई-लर्निंग उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी ई-लर्निंग सोल्युशन उपयुक्त आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केले. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व इल्सविअर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तात्पुरत्या व ऐच्छिक स्वरुपाचे डिजिटल कन्टेन्ट विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरीता MUHS App चे उदघाटन ऑनलाइन पद्धतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, इल्सविअरचे व्यवस्थापकीय संचालक शंकर कौल, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार झा, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमात अमित देशमुख म्हणाले की, युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी युध्दजन्य परिस्थितीमुळे देशात परतले आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने इल्सविअर संस्थेच्या सहकार्याने कमी कालावधीत उपयुक्त कंटेन्ट सुरू केला आहे. विद्यापीठाचे हे काम कौतुकास्पद आहे. युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अमित देशमुख म्हणाले की, आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने तयार केलेले MUHS App विद्यार्थी, शिक्षक व पालकांना त्वरित माहिती मिळविण्यासाठी वापरता येईल. डिजिटल युगात जागतिक भरारी घेण्यासाठी विद्यापीठाने पंख पसरले आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना मिळावी यासाठी शासनाचा वैद्यकीय शिक्षण विभाग व विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने आरोग्य विद्यापीठ आवारात लवकरच पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्थाचा शुभारंभ होईल. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमात कुलगुरू माधुरी कानिटकर म्हणाल्या की, मंत्री अमित देशमुख यांनी दीक्षांत समारंभाप्रसंगी युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासंदर्भात सूचना केल्या होत्या. या अनुषंगाने इल्सविअर संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठाने ऑनलाइन कंटेन्ट उपलब्ध करून दिला आहे. विद्यापीठ परिसरात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीचे महाविद्यालयास लवकरच प्रारंभ होणार आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठीची कार्यवाही सुरू आहे. विद्यापीठाकडून वर्कशॉपच्या माध्यमातून प्रॅक्टीकल बेडसाइड दिला जाणार असल्याचा मानस आहे यासाठी संलग्नित महाविद्यालय प्रमुखांशी चर्चा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू म्हणाल्या की, विद्यापीठ व इल्सविअरने तयार केलेला तीन महिने कालावधीसाठीचा ई-लर्निंग सोल्युशन कंटेन्ट ऐच्छिक आहे. विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार, सुविधेनुसार व शिकण्याच्या वेगानुसार ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना डिजिटल कंटेंन्ट निःशुल्क उपलब्ध उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाने सामाजिक दायीत्व लक्षात घेऊन ऑनलाइन शिक्षणासाठी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी या शिक्षणात सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.
कुलुगुरू म्हणाल्या की, आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट मोबाइलवर MUHS App ॲपव्दारा विद्यापीठाची माहिती, व्हिजन डॉक्युमेंट, बृहत आराखडा, राष्ट्रीय सेवा योजनांची माहिती, विविध उपक्रम, आंतरवासियता योजना संदर्भात माहिती, डिजिटल लायब्ररी, ग्रीष्मकालीन आंतरवासियता कार्यक्रम, रॅगिंग प्रतिबंधासाठी माहिती, संशोधन, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमाविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. डिजिटल जगात जागतिक स्तरावर भरारी घेण्यासाठी विद्यापीठाने ॲपच्या माध्यमातून प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.
केंद्रीय मंत्र्यांच्या मतदार संघात संतती नियमनासाठी आलेल्या आदिवासी महिलांसोबत धक्कादायक प्रकार
VIDEO | ‘पुष्पा’चा नाशिकमध्ये धुमाकूळ; शेतकऱ्यांना 60 लाखांचे लावले चंदन, प्रकरण काय?
दहावी-बारावीच्या परीक्षा होणार की नाही, झाल्या तर कशा; सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला!