नाशिक : देशांतर्गत प्रचंड कांद्याची आवक झाली. कोसळलेले कांद्याचे बाजार भाव या मातीमोल बाजारभावाचा विरोध करण्यासाठी ठीक-ठिकाणी आंदोलन झाले. येवल्यात कांदा जाळून होळी करण्यात आली. चांदवडमध्ये इच्छा मरण तर देवळा तालुक्यातील गाव विकणे असे आंदोलन करण्यात आले. मात्र, जगभरात कांद्याला प्रचंड मागणी आहे. कांद्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत प्रचंड कांद्याची आवक होत आहे. कांद्याचे बाजारभाव किलोला चार-पाच रुपयेपर्यंत पोहोचले आहेत. कांद्याच्या दारात सुधारणा होण्यासाठी प्रथमच नाफेडमार्फत लाल कांद्याची खरेदी साडेआठ रुपये ते साडेनऊ रुपयेपर्यंत केली जात आहे.
जगभरात कांद्याला प्रचंड मागणी असल्याने कांद्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याला टक्कर देणाऱ्या पाकिस्तानमध्ये झालेल्या पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानमध्ये एक किलो कांद्यासाठी 200 रुपये मोजावे लागत आहेत. तर दक्षिण कोरियात एक किलो कांदा 250 रुपये, अमेरिकेत 240 रुपये, तैवान 200 रुपये, जपानमध्ये 200 रुपये, कॅनडामध्ये 150 रुपये तर फिलिपाईन्स देशात एक किलो कांद्याला 3,500 हजार रुपये भारतीय चलनानुसार मोजावे लागत आहे.
कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार वर्षात उन्हाळा आणि लाल कांद्याची आवकेत वाढ होत गेली. बाजार भावात घसरण झाली. 2019-20 मध्ये 59 लाख 94 हजार 207 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला कमाल 11,111 रुपये, किमान 100 रुपये तर सरासरी 3110 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला. 2020-21 मध्ये 63 लाख 44 हजार 658 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला कमाल 6500 रुपये, किमान 200 रुपये तर सरासरी 2690 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला.
2021-22 मध्ये 85 लाख 34 हजार 261 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला कमाल 3652 रुपये, किमान 225 रुपये तर सरासरी 1648 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला. 2022-23 मध्ये जानेवारीपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 72 लाख 65 हजार 217 क्विंटल झाली. कमाल 1200 रुपये, किमान 400 रुपये तर सरासरी 760 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळतो. परदेशात कांद्याला चांगली मागणी आहे. बाजारभाव असल्याने कांद्याची जास्तीजास्त निर्यात कशी केली जाईल. याकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.