कट्टरतावाद्यांचा विरोध झुगारत नाशिकमध्ये बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह संपन्न, अंनिसचे पदाधिकारी मामाच्या भूमिकेत

| Updated on: Jul 23, 2021 | 12:27 AM

गेल्या 2 महिन्यांपासून चर्चेत असलेला आडगावकर आणि खान परिवारातील लग्नसमारंभ आज अखेर पार पडला. हिंदु व मुस्लिम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला.

कट्टरतावाद्यांचा विरोध झुगारत नाशिकमध्ये बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह संपन्न, अंनिसचे पदाधिकारी मामाच्या भूमिकेत
Follow us on

नाशिक : गेल्या 2 महिन्यांपासून चर्चेत असलेला आडगावकर आणि खान परिवारातील लग्नसमारंभ आज अखेर पार पडला. हिंदु व मुस्लिम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला. अनेक हिंदू संघटनांनी या विवाहाला लव्हजिहादचा रंग देण्याचा प्रयत्न करत विवाह होऊ न देण्याचा इशारा दिला होता. मात्र, धर्मांध संघटनांच्या विरोधाला झुगारून अनेक सामाजिक संघटनांच्या पाठिंब्यासह हा विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रहार संघटना, राष्ट्र सेवा दल, छात्रभारती अशा सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावत लग्नाला पाठिंबा दिला.

गेल्या 2 महिन्यांपासून खान आणि आडगावकर परिवारातील हा विवाह पुरोहित आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे देशभर चर्चिला गेला होता. या विवाह सोहळ्याला हिंदुत्ववाद्यांनी विरोध केल्याने हा विवाह रद्द झाला अशाही वावड्या उठविण्यात आल्या. मात्र, आज या दोन्ही परिवारांनी पुरोहितांच्या धमक्यांना न जुमानता दोन्ही धर्माप्रमाणे लग्न करत सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. वर आसिफ खान आणि वधू रसिका अडगावकर यांचा विवाह थाटामाटात पार पडल्याने हे नवदाम्पत्य आनंदात आहे.

“पुरोगामी संघटनांकडून लग्न सोहळ्याला संरक्षण”

हिंदुत्ववादी संघटना आणि पुरोहित संघटनांनी हा विवाह सोहळा लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी या लग्न सोहळ्या विरोधात समाज माध्यमांवर मोहिम राबवली. या मोहिमेला पुरोगामी संघटनांनी विरोध करत या लग्न सोहळ्याला संरक्षण देण्याचं जाहीर केलं. यामुळे हा लग्न सोहळा देशभर चर्चेत आला होता. मात्र या वादामुळे हा विवाह सोहळा होणार की नाही असा प्रश्नही निर्माण झाला. मात्र, आज नाशिकच्या एका हॉटेलमध्ये खान आणि आडगावकर कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

अखेर बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न, अंनिसचे पदाधिकारी मामांच्या भूमिकेत

नाशिक येथील हा आंतरधर्मीय विवाह अगदी मोजक्या लोकांमध्ये पार पडला. हिंदु व मुस्लीम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला. या विवाह सोहळ्यात मुलाचे मामा म्हणून अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे उभे राहिले. यावेळी संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याचं समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. अनेक पुरोगामी संघटनांनी या विवाहाला पाठींबा दर्शविला होता. कुटुंबियांची नामदार बच्चू कडू यांनी भेट घेतली होती. अंनिसच्या नाशिक येथील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कुटुंबियांची भेट घेतली होती. पोलीस आयुक्तांना संबंधित विवाहाला विरोध करणारांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते.

“जात पंचायतींच्या धमक्यांना भिक न घालता विवाह”

यावर बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले, “या लग्नाला मुलीकडून जात पंचायतीने विवाह सोहळा करण्यास प्रखर विरोध केला होता. विवाहाचे पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. असे करणे म्हणजे जात पंचायतीच्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचा भंग आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतर विरोध मावळला व विवाह सोहळा शांतपणे उत्साहात पार पडला.”

या लग्न सोहळ्याला इतरांनी विरोध केला असला तरी मात्र या नवदाम्पत्य आणि त्यांच्या परिवाराने जात धर्माची दरी ओलांडून घेतलेला निर्णय हा समाजासमोर एक नवा आदर्श उभा राहील हे मात्र नक्की.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

मुलगी तयार, तिच्या घरचे तयार, बाहेरचे म्हणतायत ‘लव्ह जिहाद’, पुण्यात जोडप्याला लग्नाआधीच धमक्या!

VIDEO : ‘मी माझ्या मर्जीने इस्लाम स्वीकारला, माझ्या कुटुंबियांपासून जीवाला धोका’, नांदेडच्या ‘त्या’ तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

सुखाने एकत्र राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांच्या संसारात लुडबूड नको, आंतरधर्मीय विवाहप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय

Interreligious marriage in Nashik in the presence of progressive organization