नाशिकः काही लोक हनुमान चालिसा म्हणायला पुण्याला पोहचले आहेत. मात्र, भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. कोल्हापुरात (Kolhapur) प्रचार शिगेला पोहोचला असतानाच काहींनी भोंगे, हनुमान चालिसा असे घाणेरडे राजकारण सुरू करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे भोंगे उतरवण्याचे काम कोल्हापूरकरांनी केले आहे. हेच महाराष्ट्राचे जनमत आहे, असा दावा शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये (Nashik) करत कोल्हापूरच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. कोल्हापूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे सत्यजीत कदम अशी लढत झाली. निवडणुकीत मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या पार पडल्या. यात सुरुवातीपासूनच जयश्री जाधव या आघाडीवर होत्या. शेवटच्या 26 व्या फेरीपर्यंत एकूण 18901 मतांनी जयश्री जाधव विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. जाधव आघाडीवर असतानाच नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत राऊतांनी आनंद साजरा केला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरच्या जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत. त्यामुळे आता हिमालयात कोण जाते ते पाहुयात. विले-पार्लेच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा हिंदुत्वाची सुरुवात केली. भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही. भोंग्यामागचे आवाज कोणाचे हे साऱ्यांना माहित आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपलेले आहे, असा दावा त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, रामनवमीला 10 राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न होता. ज्या ठिकाणी निवडणूक तिथे दंगली घडवायच्या होत्या. हिजाबचा मुद्दा उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर संपला. पण महाराष्ट्रात सत्ता येत नाही म्हणून भाजप निराशेने ग्रासला आहे. त्यांचे इथे नव हिंदू ओवेसेमार्फत दंगली घडवण्याचे कारस्थान आहे. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, हनुमान चालीसाची पहिली दोन कडवी देखील त्यांना पाठ नसतील. त्या तथाकथित हनुमान भक्तांनी कॅमेऱ्यासमोर येऊन हनुमान चालीसा म्हणावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी हनुमान चालीसा म्हणत असल्याचे सांगत स्त्रोत म्हटले. पत्रकारांनी ही चालीसा नसून, स्तोत्र असल्याचे सांगताच त्यांची गडबड झालेली दिसली.