वाजवा रे वाजवा! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे

| Updated on: Oct 20, 2021 | 12:42 PM

ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. (maharashtra government taken back firecrackers ban decision)

वाजवा रे वाजवा! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे
firecrackers
Follow us on

नाशिक: ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देशही दिले होते. विशेष सभा घेऊन फटाके बंदीबाबत आपआपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशही गमे यांनी दिले होते. राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ योजने अंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेऊन फटाके विक्रीवर बंदी घातली होती.

हिंदुत्ववादी संघटना नाराज

विभागीय पातळीवर पहिल्यांदाच फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्याने स्थानिकांसह फटाके विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयावर हिंदुत्ववादी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला. भुजबळ यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी थेट संवाद साधून फटाके बंदीचा निर्णय मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

महापालिकेत पडसाद उमटण्याआधीच निर्णय

दरम्यान, फटाके बंदीच्या निर्णयाचे महापालिकेच्या महासभेत पडसाद उमटणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यापूर्वीच प्रशासनाने हा निर्णय जाहीर केल्याने वादावर पडदा पडला आहे.

गेल्यावर्षीही बंदी

दरम्यान, नाशिकमध्ये गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर 2020च्या मध्यरात्रीपासून फटाके फोडण्यात बंदी घालण्यात आली होती. फटाके फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. राज्यातील कोरोनाचं संकट अद्यापही गेलेलं नाही. त्यातच थंडी वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची चिन्हे आहेत. शिवाय दिवाळीत फटाके फोडल्यास कोरोनाचा संसर्ग आणि वाढण्याची शक्यता असल्याचं सांगत ही फटाके बंदी घालण्यात आली होती.

 

संबंधित बातम्या:

देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांतदादांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर

पाकिस्तानसोबत एक तरी लढाई झाली पाहिजे, भारत-पाक क्रिकेट सामना नकोच; रामदास आठवलेंचा षटकार

लखीमपूर हिंसेत ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिंचं चंद्रभागेत विसर्जन; वारकरी आणि शेतकऱ्यांनी काढली दिंडी

(maharashtra government taken back firecrackers ban decision)