नाशिक : चमचमीत मिसळीच्या चवीने आबालवृद्धांना भुरळ पाडणाऱ्या नाशकातील प्रसिद्ध ‘सीताबाईची मिसळ’च्या (SitabaiChi Misal) संचालिकेचे निधन झाले. ‘मिसळवाल्या आजी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सीताबाई मोरे (Sitabai More) यांनी मंगळवारी सकाळी नाशकात अखेरचा श्वास घेतला. सीताबाईंच्या जाण्याने कुटुंबीय आणि आप्तांसह खवय्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.
75 वर्ष खवय्यांच्या मनावर अधिराज्य
वृद्धापकाळाने वयाच्या 94 व्या वर्षी सीताबाई मोरे यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. जवळपास 75 वर्ष त्यांनी खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. मिसळच्या रुपाने नाशिकच्या खाद्य संस्कृतीला सीताबाईंनी नवीन ओळख मिळवून दिली होती. नाशिकची मिसळ नगरी अशी ख्याती होण्यामागेही त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे.
जुन्या नाशिकमधून मिसळ व्यवसायाला सुरुवात
‘मिसळवाल्या आजी’ असा सीताबाईंचा पंचक्रोशीत लौकिक होता. जुन्या नाशिकसारख्या छोट्याशा भागातून त्यांनी मिसळ व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर संपूर्ण शहरात मिसळ विक्रीबाबत त्यांची कीर्ती पसरली. अल्पावधीतच त्यांनी यशस्वी उद्योजिका म्हणून नाव कमावलं. त्यांची मेहनत, चिकाटी युवा पिढीला प्रेरणा देणारी होती.
आजीबाईंच्या हातची चव ठरली युनिक
सीताबाईंनंतर नाशिकमध्ये उदयास आलेल्या अनेक मिसळ विक्रेत्यांची चव सीताबाईंच्या मिसळीच्या चवीपुढे फिकीच पडली. पतीच्या आजारपणामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी हा पर्याय निवडला. मिसळ व्यवसायावर त्यांनी आपली तीन मुलं आणि एका मुलीचे पालनपोषण केले. आज नातवंड-पतवंडांच्या जन्मानंतरही स्वतः सीताबाई हॉटेलात कार्यरत असायच्या. सीताबाईंच्या मिसळीचा ब्रँड तयार झाला असून नाशिकमध्येच त्यांच्या तीन शाखा सुरु झाल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Nashik Misal : मिसळ नगरी नाशिकमध्ये निर्बंधात दिलासा, व्यावसायिकांसह खवय्यांमध्ये आनंदाचं वातावरण