हिट अँड रनचा कहर! ‘या’ जिल्ह्यात 85 जणांना मुजोर चालकांमुळे गमवावा लागला जीव

| Updated on: Jul 11, 2024 | 6:47 PM

राज्यात हिट अँड रन केस प्रकरणांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात तर गेल्या पाच महिन्यांमध्ये 85 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांनी रस्त्यावरून जायचं की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय.

हिट अँड रनचा कहर! या जिल्ह्यात  85 जणांना मुजोर चालकांमुळे गमवावा लागला जीव
Follow us on

नाशिकमध्ये नागरिकांनी आता पायी चालावं की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये पुण्या पाठोपाठ नाशिक शहरांमध्ये देखील ही हिट अँड रन च्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शहरात गेल्या दहा दिवसात हिट अँड रन मुळे तब्बल चार पादुचरांचा मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांचा जर आकडा बघितला तर अवघ्या पाच महिन्यात 85 जणांना बेदरकार वाहन चालवणाऱ्या मुजोर चालकांमुळे जीव गमवावा लागला आहे. यामधे 17 महिलांचा समावेश आहे.

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे अशी भावना मयत झालेल्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. या आठवड्यातच नाशिक शहरात झालेल्या हिट अँड रन च्या घटनांमध्ये जवळपास चार जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झाले.

नाशिकच्या अशोका मार्ग येथे 86 वर्षीय मधुकर नेगे यांना सुसाट दुचाकी चालवत आलेल्या चालकांने धडक दिली यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. ७ जुलै रोजी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या येवलेकर मळ्यात बॉईज टाऊन रस्त्यावर संध्याकाळी भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या 49 वर्षीय निधी वारे यांना पाठीमागून सुसाट आलेल्या टेम्पोने धडक दिली यात त्यांचा मृत्यू झाला तर विठ्ठल भाबड या 65 वर्षीय वृद्धाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्यात ते गंभीरता जखमी झालेत.

७ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील विसे मळ्याजवळ सुसाटकार चालकांने पाठीमागील बाजूने दुचाकीस्वारांना धडक दिली या धडके 31 वर्षीय चेतन चव्हाण आणि 27 वर्षीय मयूर नंदन हे दोघे मित्र गंभीर रित्या जखमी झाले. 9 जुलै रोजी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील बारदान फाटा येथे मध्य धुंदकारचालकान रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेस पाठीमागील बाजून जोरदार धडक दिली यात अर्चना शिंदे या 31 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. 10 जुलै रोजी नाशिक रोड परिसरात सिटी लिंक बसच्या धडकेत सानवी गवई या पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय.

दरम्यान पोलिसांनी आता या प्रकरणी शहरात नाकाबंदी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या संदर्भात कठोर पावला उचलली जातील असा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शहरात घडणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण असताना दुसरीकडे मुजोर वाहनचालकांची दादागिरी वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. पोलिसांनी वेळीच या प्रकरणी कारवाई न केल्यास नागरिकांचा उद्रेक होईल अशी परिस्थिती सध्या नाशिकमध्ये बघायला मिळते आहे.