मालेगाव : शहरालगत असलेल्या सवंदगाव शिवारात मनपाच्या मल्लनिस्सारण प्रकल्पाचे कामकाज गेल्याकाही वर्षांपासून सुरु आहे. सदर मल्लनिस्सारण प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सवंदगावकडे (Savandgaon) जाणारा रस्ता खोदून पाईप टाकले आहेत. मात्र पाईप टाकल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती (Repair) न केल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल झालायं. त्यामुळे येथील नागरिकांचा दळण-वळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची शाळेची वाट देखील चिखलात लुप्त झाल्याने अनेक अडचणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह सवंदगाव रस्त्यावर साचलेल्या चिखलातच ठिय्या आंदोलन (Movement) केले.
उपायुक्त राजू खैरनार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन आठवडाभरात काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मालेगाव शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता मनपाने सवंदगाव शिवारात मल्लनिस्सारण प्रकल्प उभारणीचा ठेका एका ठेकेदाराला दिला आहे. सदर ठेकेदाराने काम अतिशय संथगतीने सुरु केले. मलनिस्सारण प्रकल्पासाठी संबंधित ठेकेदाराने सवंदगावकडे जाणारा रस्ता खोदून याठिकाणी पाईप टाकली आहेत. पाईप टाकून झाल्यानंतर मात्र सदर रस्त्याची पुन्हा पूर्ववत दुरुस्ती केली नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे याठिकाणी चिखल साचला आहे.
सवंदगावकडून मालेगावकडे ग्रामस्थांनी नियमित वर्दळ असते. येथील विद्यार्थी मालेगाव शहरात शिक्षणासांठी येतात. पूर्णपणे शहरावर अवलंबून असलेल्या सवंदगावातून दिवसभरात हजारो नागरिकांना या चिखलातून वाट तुडवावी लागते. या चिखलात वाहने घसरत असून पायी चालणाऱ्यांना देखील चालणे मुश्किल झाले आहे. आठवडाभरात अनेक नागरिकांच्या दुचाकी येथे घसरुन त्यांना किरकोळ दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या दुरावस्थेची मनपासह संबंधित ठेकेदाराने दखल न घेतल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. सदर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच मनपाचे उपायुक्त राजू खैरनार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आंदोलक चिखलातच थांबल्यामुळे उपायुक्त खैरनार यांनी देखील वाहनातून उतरित चिखल तुडवित ग्रामस्थांची भेट घेवून चर्चा केली. याठिकाणी आठवडाभरात मनपातर्फे मुरुम टाकून रस्ता तयार करुन देण्यात येईल. याशिवाय संबंधित ठेकेदाराशी चर्चा करुन रस्ता पुन्हा पूर्ववत करण्याबाबत सूचना करण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्त खैरनार यांनी दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सरपंच ज्योस्ना शेवाळे, उपसरपंच सचिन शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, देविदास शेवाळे, पिकन शेवाळे, गमन शेवाळे,सविता पवार, प्रकाश पवार, जगदीश बागुल, मनोहर शेवाळे, गोकुळ बच्छाव, तात्याभाऊ शेवाळे, शिवराम शेवाळे संदीप शेवाळे विजय शेवाळे आदी उपस्थित होते.