मनमाड : आई-वडिलांचा सांभाळ करणं ओझं वाटल्याने त्यांची वृद्धाश्रमात रवानगी करण्याची उदाहरणं हल्ली पाहायला मिळतात. मात्र मनमाडमध्ये घडलेली घटना कोणाच्याही डोळ्यात टचकन पाणी आणेल. आपल्या आईची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी या श्रावणबाळाने प्रसंगी सरकारी उंबरे झिजवले. पतीच्या कबरेशेजारी चिरशांती घेण्याची आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी लेकाने तिचे पार्थिव तीन महिन्यांनी बाहेर काढून इच्छितस्थळी दफन केले. (Man opens his mother grave to fulfill her last wish in Malegaon Manmad)
मालेगावात राहणाऱ्या मंजुळा वसंतराव क्षीरसागर यांनी मुलगा सुहासकडे अखेरची इच्छा व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये आपल्या पतीच्या कबरेशेजारी दफन होण्याची त्यांची कामना होती. त्यांचे पूर्ण आयुष्य तिथेच व्यतीत झाले होते.
सप्टेंबर महिन्यात जगाचा निरोप
सप्टेंबर महिन्यात मंजुळा यांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची लक्षणं दिसल्याने मालेगावातील कोव्हिड रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. 22 सप्टेंबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, मात्र अहवाल येण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
कोरोना संशयातून मनमाडमध्येच दफन
मंजुळा क्षीरसागर यांचे निधन झाले, त्या मालेगावातील रुग्णालयापासून त्यांचे मूळ गाव 37 किलोमीटर दूर होते. कोरोना अहवाल येणे बाकी होते, मात्र स्थानिक अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना त्या कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांनी मनमाडमध्येच मंजुळा यांचे अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे मुलगा सुहासला नाइलाजास्तव मालेगावात अंत्यसंस्कारासाठी परवानगी द्यावी लागली.
तीन महिन्यांचा लढा
मंजुळा क्षीरसागर यांचे दफनविधी झाल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल आला, त्यामध्ये त्या निगेटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे दोन्ही मुलांनी आपल्या आईची अखेरची इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. आईचे पार्थिव मनमाडच्या कब्रस्तानात दफन करण्याचा निर्धार त्यांनी केला. जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. तीन महिन्यांच्या लढ्यानंतर त्यांना यश आलं. प्रशासनाने मंजुळा क्षीरसागर यांचे पार्थिव सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबाकडे सोपवलं. त्यानंतर मनमाडमध्ये ख्रिस्ती रिवाजानुसार त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं.
मनमाडमधील सेंट बर्नाबा चर्च कबरस्तानात गुरुवारी सुहास यांनी आपल्या आईचे पार्थिव दफन केले. “मी माझ्या आईची अखेरची इच्छा पूर्ण केली, त्यामुळे माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत आहे” अशा भावना सुहासने व्यक्त केल्या.
मंजुळा क्षीरसागर यांचे पार्थिव 17 डिसेंबरला सकाळी 8 वाजता पोलिस, सरकारी अधिकारी, ख्रिस्ती मंडळ आणि न्यायाधीशांच्या उपस्थितीत मालेगावातील कबरस्तानातून विधीवत बाहेर काढण्यात आले. कारने ताबूत मनमाडमधील ख्रिस्ती कबरस्तानात आणून विधीपूर्वक दफन करण्यात आलं. आईच्या अखेरच्या इच्छेसाठी लेकांनी केलेले प्रयत्न पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
(Man opens his mother grave to fulfill her last wish in Malegaon Manmad)