VIDEO | गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा हैदोस, माध्यम प्रतिनिधींना मारहाण

| Updated on: May 17, 2023 | 12:01 AM

नाशिकमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात एक अतिशय अनपेक्षित प्रकार समोर आला आहे. कार्यक्रमात काही हुल्लडबाज तरुणांकडून मीडिया प्रतिनिधींवर हल्ला करण्यात आलाय. यामध्ये काही माध्यम प्रतिनिधी जखमी झाले आहेत.

VIDEO | गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा हैदोस, माध्यम प्रतिनिधींना मारहाण
फाईल फोटो
Follow us on

नाशिक : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा नाशिकमध्ये मंगळवारी (16 मे) संध्याकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात काही हुल्लडबाज आणि दारुच्या नशेतील तरुणांनी मीडिया प्रतिनिधींवर हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हुल्लडबाजांकडून ‘टीव्ही 9 मराठी’चे कॅमेरामन आकाश येवले यांनादेखील मारहाण करण्यात आली आहे. यावेळी एकीकडे गौतमीचा कार्यक्रम सुरु होता. तर दुसरीकडे माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात येत होती.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या नवनिर्माण सेवाभावी संस्थेकडून गौतमी पाटीलच्या विशेष लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं. नाशिकच्या ठक्कर डोम येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमादरम्यान टवाळखोरांनी मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माध्यम कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ‘टीव्ही 9 मराठी’चे नाशिकचे कॅमरामन आकाश येवले यांनादेखील मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

हल्ला करणारे हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी प्रचंड हुल्लडबाजी केली. त्यामुळे हा कार्यक्रम बंद पाडण्याची वेळ आयोजकांवर आली. आयोजकांनी सातत्याने कार्यक्रम बंद करणार असल्याचा इशारा दिला. पण हुल्लडबाजांची हुल्लडबाजी काही कमी होताना दिसली नाही. याउलट त्यांनी माध्यम प्रतिनिधींवर हल्ला केला.

नाशिक पोलीस काय कारवाई करणार?

या संपूर्ण घटनेनंतर आता नाशिक पोलीस हुल्लडबाजांवर काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज्यभरात गौतमीचे कार्यक्रम जिथे आयोजित करण्यात येतात तिथे अशाच प्रकारची हुल्लडबाजी बघायला मिळते. नाशिकमध्ये हुल्लडबाजांनी तर पत्रकारांवर हल्ला केलाय. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पोलीस या सातत्याने होणाऱ्या घटनांवर काही मधला मार्ग काढतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अगदी गल्लीपासून ते जगभरातील घटनांची इत्यंभूत माहिती देणाऱ्या पत्रकारांवर अशाप्रकारे हल्ला केला जात असेल तर हे निंदनीय आहेत. ऊन, थंडी, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत पत्रकार आपलं चोख काम पार पाडत असतात. शेतकरी, होतकरु, गरजूंच्या समस्या सरकार दरबारी मांडण्यात पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातोय. असं असताना पत्रकारांवर अशाप्रकारे हल्ल्याची घटना घडल्याने या घटनेवर अनेकांकडून जाहीरपणे निषेध व्यक्त केला जातोय. या प्रकरणी योग्य कारवाईची मागणी केली जात आहे.