नाशिक : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. राहुल नार्वेकर पत्रकार परिषद घेऊन 16 आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याविषयी भाष्य करत आहेत. त्यावरच राऊत यांनी अक्षेप घेतला आहे. मी कोणता खटला चालवणार, कसा चालवणार हे कधी कोणता न्यायाधीश सांगतो का? राहुल नार्वेकर का सांगत आहेत? असा सवाल करतानाच अशा पद्धतीने एखाद्या खटल्याची माहिती देणारा हा पहिलाच माणूस मी पाहिला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केली आहे.
राहुल नार्वेकरांच्या पक्षांतराविषयी आणि वैचारिक बैठकीविषयी सांगितलंच आहे. पक्षांतर हा त्यांचा छंद आणि व्यवसाय आहे,. हे स्पष्टपणे सांगतो. ते ज्या पक्षात गेले नाहीत असा एकही पक्ष उरला नाही. त्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड असण्याचं कारण दिसत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने मुलाखती दिल्या आहेत. त्या भगतसिंह कोश्यारी यांना शोभत होत्या. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने नियमबाह्य वर्तन करू नये हे संकेत आहेत, असं संजय राऊत यांनी सुनावलं.
कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी संविधान निर्माण झालंय. तुम्ही कायद्याचं राज्य मोडीत काढण्यासाठी संविधानाचा वापर करत आहात. तुम्ही ज्या मुलाखती देत आहात त्या कायद्याच्या राज्यात बसत नाहीत. न्यायालयासमोर जो खटला चालवला जातो, तेव्हा न्यायामूर्ती पत्रकार परिषदा घेत नाही. मी काय करणार हे सांगत नाही. मला काय अधिकार आहे हे सांगत नाहीत. मी हा पहिला माणूस पाहिला. पहिले कोश्यारी आणि दुसरे हे. कोणताही न्यायामूर्ती समोर येऊन सांगत नाही माझ्यासमोर हा खटला चालणार आहे. मी हा निकाल देणार आहे. मी हे करणार आहे. हे पहिले गृहस्थ आहेत. त्यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.
हनी ट्रॅप प्रकरणात प्रदीप कुरुलकर प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. देशद्रोही कोण हे रोज स्पष्ट दिसत आहे. संघाचा एक प्रमुख प्रचारक पाकिस्तानाच्या हनी ट्रॅपमध्ये येतो. त्यावर भाजपचे लोक एसआयटी का नेमत नाही? नाशिकपर्यंत त्याचे धागेदोरे आहेत. हवाई दलाचे लोक त्यात अडकले आहेत. ते सर्व भाजपशी संबंधित आहेत. नेमा एसआयटी. पण त्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी त्र्यंबकेश्वर, अकोला आणि शेगाव दंगली घडवत आहेत. महाराष्ट्र एकसंघ आहे. राहील. या टोळीबाजांना आम्ही उत्तर देऊ. हे लोक मराठी राज्याचं नुकसान करत आहेत, असा हल्लाच त्यांनी चढवला.