नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी निघालेल्या नाशिक पोलिसांनी आपला प्लॅन बदलला आहे. नाशिक पोलीस आता चिपळूणला न जाता रत्नागिरीत जाऊन नारायण राणे यांना अटक करणार आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना आता रत्नागिरीत अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी एक तासापूर्वी पुणे सोडून रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले. सकाळी आठच्या सुमारास नाशिक पोलिस हे नारायण राणेंना अटक करण्यसाठी कोकणाकडे रवाना झाले.
दरम्यान, नाशिकमध्ये शिवसैनिकांनी नारायण राणेंचा पुतळा जाळला. शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांचा सेना कार्यालया बाहेर तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला.
शिवसैनिक म्हणून अॅक्शनला रिअॅक्शन, तर शासन म्हणून कायद्याने कारवाई करु : गृहराज्य मंत्री
नारायण राणेंनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, ही अॅक्शनला रिअॅक्शन आहे, नारायण राणेंनी सुरुवात केलीय, बेजबाबदार वक्तव्याचे परिणाम येणारच, आम्ही शासन म्हणून कायदा अबाधित राखण्याचं काम आम्ही करु, पण कायदा बिघडवायची सुरुवात कोणी केली, कोण जबाबदार आहे हे निश्चित बघू, कायद्याप्रमाणे कारवाई करु, जनतेचा उद्रेक वाढला तर त्याला केवळ आणि केवल नारायण राणे हे जबाबदार आहेत, असं गृहराज्य मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल.
राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना अटकेनंतर माहिती दिली जाईल. संबंधित जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी त्यांना माहिती दिली जाईल. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांनाच संविधानात क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना मुभा नाही. या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे.
गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं.
संबंधित बातम्या
Narayan Rane Live : नाशिक पोलिसांचा प्लॅन बदलला, नारायण राणेंना चिपळूणमध्ये अटक करणार नाही!