Lok Sabha Election 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी रण पेटले आहे. चार टप्प्यातील निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रावर सर्वाधिक फोकस असल्याचे दिसून आले. पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात पुन्हा एकदा डेरेदाखल झाले आहेत. नाशिकमध्ये त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. मोदी काँग्रेसवर तुटून पडले. काँग्रेस मुस्लीम वोटबँकेसाठी बजेटचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
धर्माच्या आधारे बजेटचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघात केला. “ही प्रभू रामाची धरती आहे. त्यामुळे गंभीर विचार इथे उपस्थित केला पाहिजे. देशातील सरकारे जेवढा बजेट तयार करते. त्यातील १५ टक्के खर्च फक्त मायनॉरिटीवर केला जात आहे. म्हणजे धर्माच्या आधारे बजेटचं वाटप केलं. धर्माच्या आधारे त्यांनी देशाचे तुकडे केले. आताही धर्माच्या आधारावर बजेटचं वाटप करत आहे. धर्माच्या आधारे बजेटच्या वितरणाला मंजुरी दिली होती.” अशी गंभीर टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
भाजपने केला मोठा विरोध
“बजेटचे असे तुकडे करणे हे किती खतरनाक आहे. तुम्ही जाणताच आहात की काँग्रेससाठी मायनॉरिटी फक्त एकच आहे. त्यांची ती प्रिय व्होटबँक आहे. मी मुख्यमंत्री असताना जेव्हा काँग्रेसने ही गोष्ट उचलली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून त्याला विरोध केला होता. काँग्रेसला तेव्हा देशातील सर्व बजेटमधील 15 टक्के फक्त मुसलमानांवर खर्च व्हावा, असं काँग्रेसला वाटत होतं. पण भाजपच्या विरोधामुळे ते शक्य झालं नाही.” असा दावा पंतप्रधानांनी केला. पण आता जुन्या अजेंड्याला लागू करण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप मोदींनी केला.
तुमच्या संपत्तीत वाटेकरी
बाबासाहेब धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास विरोधात होते. पण काँग्रेसला एससी, एसटी, आणि ओबीसींचं आरक्षण काढून ते मुसलमानांना द्यायचं आहे, असा आरोप मोंदींनी काँग्रेसवर केला. तुमची संपत्ती जप्त करून त्यातील हिस्सा मुस्लिमांना देण्याची त्यांची तयारी आहे. लक्षात ठेवा, मोदी धर्माच्या आधारे बजेटचं वाटप होऊ देणार नाही आणि धर्माच्या आधारे आरक्षण देऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मी चौकीदार
वंचितांचा जो अधिकार आहे, मोदी त्याचा चौकीदार आहे. आम्ही तर शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने काम करणारे लोक आहोत. ही निवडणूक केवळ खासदार निवडायची नाही. तर पंतप्रधान निवडायची. बलशाली भारत करण्यासाठी कठोर निर्णय घेणारा पंतप्रधान हवा. कोरोनाचं संकट आलं. आपण त्याचा मुकाबला केला आणि त्यात आपण जिंकलो, असे पंतप्रधान म्हणाले.