नाशिकः नाशिकमधील (Nashik) आयमा इंडेक्स (IMA Index) प्रदर्शनाला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यातून एक-दोन नव्हे, तर तब्बल अडीच हजार कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात झालीय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तीन उद्योगांनी 850 कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तर प्रदर्शनाच्या समारोपादिवशी तब्बल 1160 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 2010 कोटींची गुंतवणूक झाली आहे. याचा रोजगार निर्मितीला मोठा फायदा होणारय. त्यात आता ब्रिटनही (Britain) नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनचे मुंबई येथे उपउच्चायुक्त कार्यालय आहे. येथील दक्षिण आशियाचे व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारताचे उपउच्चायुक्त एलेन गेमेल ओबे, फर्स्ट सेक्रेटरी बेथ येटस् यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनीही गुंतवणूक करण्यास अनुकुलता दाखवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उद्योगनगरी नाशिकचे आकर्षण सातासमुद्रापार साऱ्यांना खुणावते आहे.
गुंतवणुकीचा ओघ वाढला
आगामी काळात नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात तब्बल 5500 कोटींची गुंतवणूक करून जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातून 5000 जणांना नोकरी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी जेएसडब्लू एनर्जी समूहाने पुढाकार घेतला आहे. हा समूह राज्यात इतर चार ठिकाणी तब्बल 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या करारावरही यापू्र्वीच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे नाशिकमध्ये तब्बल 100 एकरवर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात. या प्रकल्पासाठी सिद्धपिंप्री शिवारातील जागेचा विचार करण्यात येत आहे. ही योजना पूर्णत्वास गेली, तर येथे 10 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
नाशिक सर्वार्थाने योग्य
आगामी काळात गुंतवणुकीसाठी उद्योजक आणि मोठ-मोठ्या कंपन्या या नाशिकला प्राधान्य देत आहेत. त्याचे कारण म्हणजे नाशिकचे हवामान साऱ्यांनाच प्रेमात पाडणारे आहे. येथून देशाची आर्थिक राजधानी मुंबई अगदी हाकेच्या अंतरावर आहे. विमान, रेल्वे साऱ्याच प्रवास सुविधा येथे आहेत. शिवाय भरपूर पाणी आहे. यामुळे महाराष्ट्रात येणारा उद्योजक पहिल्यांदा नाशिकची चाचपणी करताना दिसून येत आहे. याचा फायदा जिल्ह्याला होणार असून, येणाऱ्या काळात मोठ्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत.