नाशिक : नाशिक (Nashik) येथील दिंडोरी नाका परिसरात वडाचे जुने झाड कोसळल्याची घटना घडलीयं. झाडाखाली रिक्षा अडकल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाहीयं. मात्र, मोठं झाड कोसळल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळतंय. आता झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सकाळच्या वेळी या रस्त्याने अनेक वाहनांची ये-जा सुरू असते आणि रस्त्यावरच झाड पडल्याने वाहतूक कोंडी (Traffic jam) झाली असून वाहनांच्या मोठं मोठ्या रांगा बघायला मिळतायंत. शालेय विद्यार्थ्यांना देखील शाळेत (School) जाण्यास यामुळे उशीर होतोयं.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झालायं. त्यामध्ये आज सकाळीच दिंडोरी नाका परिसरात वडाचे जुने झाड पडल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालायं. सध्या या झाडाला रस्त्याच्या बाजुला करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याचे सांगितले जातंय. मात्र, झाड मोठे असल्याने वेळ लागण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरात पहिल्याच पावसात रस्त्यांचे तीन तेरा वाजले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण होऊन मोठं मोठे खड्डे पडल्याचे चित्र संपूर्ण शहरातील रस्त्यांचे आहे. यामुळे नागरिकांना रस्त्याने गाड्या चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहनचालकांना खड्डयाचा अंदाज येत नसल्याने गाडी थेट खड्ड्यात जाते. यामुळे गाडीचे मोठे नुकसान होतेच, शिवाय वाहनचालकांच्या मानेलाही झटका बसतो. यामुळे शहरातील खड्ड्यांची समस्या लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.