नाशिकः नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयात 3 महिला बोगस डॉक्टर (Doctor) आढळल्याने खळबळ उडालीय. रुग्णालयाच्या बाहेर फिरत असताना इन्चार्ज नर्सला संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. इन्चार्ज नर्सने आरडाओरड करून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या बोगस डॉक्टरांना सरकारवाडा पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले आहे. याबाबत पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलीय. या महिला रुग्णालयाबाहेर का फिरत होत्या, याबाबत विचारपूस करण्यात येतेय. बाहेरचे कुठलेही डॉक्टर, कर्मचाऱ्यांना रुग्णालयात येऊन काम करण्यास सांगितले नसल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीनिवास यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात तोतया महिलांकडून तपासणी सुरू करण्याचा हा प्रकार गेल्या आठ दिवसांपासून सुरू होता. दोन महिला आणि एक तरुणी डॉक्टरच्या वेशात यायच्या. त्या तेथील रुग्णांची तपासणी करायच्या. ही बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना समजली. त्यांनी इन्चार्ज शेख यांना या डॉक्टरांची माहिती विचारली. त्यांची नियुक्ती कधी झाली आहे, याची विचारणा केली. मात्र, त्यांनी तसे काहीही झाले नसल्याचे सांगितले आणि हा प्रकार उघड झाला.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या महिला डॉक्टरांची नावे विचारली. कधी जॉइन झालात, असा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा घटनेचे गांभीर्य ओळख कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात खबर करून त्यांच्या ताब्यात दिली. या प्रकरणी तिन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
डॉक्टरांच्या वेषात जिल्हा रुग्णालयात वावरण्याची बाब गंभीर आहे. आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याला ओळखपत्र कम्पलसरी केले आहे. रुग्णांनी आणि नातेवाईकांनी ओळखपत्र पाहूनच डॉक्टरांची खात्री करावी. अनोळखी व्यक्तींनी काही गैरप्रकार केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिला आहे.