नाशिकः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत (Exam) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी नाशिकमध्ये (Nashik) जोरदार आनंदोत्सव साजरा केला. ढोल-ताशा लावून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी रस्त्यावर नृत्याचा ठेका धरला. त्यात गुलालांची होणारी उधळण पाहून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, असेच चित्र होते. या विद्यार्थ्यांनी 2019 मध्ये परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच लागला. त्यात कोणी फौजदार झाले, तर कोणी आणखी काही. कित्येक वर्ष डोळ्यात प्राण आणून जी परीक्षा द्यायचो, त्या परीक्षेत पास झाल्याचे पाहून त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मित्रमंडळींनी बातमी समजताच हार आणि पेढ्याची व्यवस्था केली. त्यांचा छोटेखानी सत्कार केला. अनेकांनी या उमेदवारांना खांद्यावर घेतले. लागलीच ढोल-ताशा मागवला आणि सुरू झाला उत्सव. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. त्यामुळे थोडी वाहतूक कोंडी झाली. मात्र, आनंदच इतका मोठा होता की, हे चालायचंच. नाही का?
नाशिकचे 40 विद्यार्थी पास
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2019 मध्ये झाली होती. या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 496 पदांपैकी 494 पदांचा निकाल 25 मार्च 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात नाशिक जिल्ह्यातील 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
कीर्तनकार लेकीची बाजी
‘एमपीएससी’ परीक्षेत नाशिकच्या कीर्तनकार लेकीने बाजी मारली आहे. रूपाली शिवाजी केदार असे या यशस्वी विद्यार्थिनीचे नाव असून, तिचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. रूपाली सिन्नर तालुक्यातल्या दोडीची. कुटुंब वारकरी. तिचे चुलते मनोहर केदार हे नोकरीसाठी आळंदीला होते. त्यामुळे आई-वडिलांच्या इच्छेनुसार रूपालीने चौथीपासून आळंदीत अध्यात्म शिक्षणासोबत शाळा सुरू ठेवली. पुढे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याकडे ओझरला काही काळ अध्यात्माचे धडे गिरवले. त्यानंतर राजाराम आव्हाड महाराजांचे मार्गदर्शन लाभले. या जोरावर रूपालीने इयत्त्या सातवीपासूनच बालकीर्तनकार ही ओळख निर्माण केली. अध्यात्माच्या शिक्षणासोबतच रूपालीने अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने ‘एमपीएससी’ची तयारी केली. आज त्यातही तिने यश मिळवले असून, तिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.
नाशिकमध्ये MPSC पास उमेदवारांचा जल्लोष…! pic.twitter.com/MTIZktmPGU
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 28, 2022
इतर बातम्याः