2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, असं एका वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचं नव्हतं की तुमच्याकडे उमेदवार नव्हता. आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटिल, अजित दादा होते. उमेदवार नव्हता की आहे. त्याला मुख्यमंत्री करायचं नव्हतं हे पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. सरकार पाडेपर्यंत भूमिका कुणी घेतल्या. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून लादल्या गेले. उध्दव ठाकरेंना अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं. सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द सुरु झाली नव्हती. म्हणून 2004 मुख्यमंत्रीचा उमेदवार नव्हता, असं मिटकरी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.
अमोल मिटकरी काय म्हटलं, हे मला माहित नाही. मी ते वक्तव्य ऐकेल तेव्हा त्यावर बोलेल. मी शिवसेना, काँग्रेस सोडली नसती तरी मुख्यमंत्री झालो असतो. मला त्याही वेळी सांगितलं गेलं होतो. पण मला पवार साहेबांना सोडायचं नव्हतं. त्यावेळी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आलो तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि मी उपमुख्यमंत्री झालो, असं छगन भुजबळ म्हणाले.
यंदाच्या निवडणुकीत काही मतदारसंघात मतदानाचा टक्का कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. उद्या मुंबईत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मतदानाच्या टक्क्यावर भाष्य केलं आहे. दुपारच्या वेळी उन्हामुळे मतदान कमी होत आहे. त्यामुळे सकाळी लवकर मतदान करा. सर्वांनी मतदान करा. सुट्टी आहे, म्हणून फिरायला जाण्यापेक्षा मतदान करा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क बजावा. टाटा, बिर्ला या सर्वांना एकच मतदान देण्याचा अधिकार दिला आहे. झोपडपट्टीतील नागरिकांनाही एकच मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढवा, असा आशावाद छगन भुजबळांनी व्यक्त केला आहे.