चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी कळवण, नाशिक | 07 ऑक्टोबर 2023 : मागच्या कित्येक वर्षांपासून आम्ही काम करतोय. पूर्वीसुद्धा आम्ही कामं केली आहेत. पण आमच्यावर आता टीका करत आहेत. आमचे आदरणीय नेते, शरद पवारसाहेब म्हणाले होते कोर्ट कचेरी करणार नाही आणि तेच तिकडे गेले आहेत. ते म्हणतात, मी राषट्रवादीचा संस्थापक अध्यक्ष आहे. पण मग मी सुद्धा संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही? माझ्याच बंगल्यावर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवलं गेलं. तुमचा मोठा वाटा पण आमचा पण खारीचा वाटा आहे की नाही?, असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला आहे.
आम्ही का गेलो याचं कारण वारंवार संगितलं जातं. आम्हीच नाही तर तुमच्यासोबत असलेल्या अनेक लोकांनी तेच सांगितलं. सगळे आमदार आणि खासदार आमच्यासोबत आहेत. एक आमदार 3 लाखांचा प्रतिनिधी आहे. न्यायाचा तराजू अजित दादांचा दादांच्या बाजूनेच सुटणार आहे. अजितदादांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आपल्याला काम करावं लागेल. 45 आमदारांचा आकडा पुढे गेला पाहिजे. झाले पाहिजे म्हणून होणार नाही, त्याची जबाबदारी उचलायला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणालेत.
कुणाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. कुणाला विरोध नाही. फक्त ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या… हीच मागणी सगळे नेते करतात. पण मलाच टार्गेट केलं जातं. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालतं. त्यामुळे इथे जातीवादाला थारा नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. म्हणून कांदा मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न होता, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत शरद पवारसाहेब आणि इतर जे बोलताय तेच मी बोलतो. मलाच का टार्गेट करत आहेत. माथी भडकवण्याचं काम करत आहेत. कांद्याच्या प्रश्न निर्माण झाला. मी अजितदादा आणि पियुष गोयल यांनी प्रयत्न केले. मार्केट बंद केल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. जे उगवतो ते विकू शकलो नाहीतर त्याचा उपयोग नाही. हे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यांसोबत बोलून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असं भुजबळ म्हणाले.