चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 08 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत येणार का? याची चर्चा होतेय. यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काँग्रेसची भूमिका मांडली आहे. वंचितसोबत शिवसेनेची चर्चा सुरू आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की ते दिल्लीत चर्चा करतील. ते महाविकास आघाडीचा घटक आहे, यात काही दुमत असण्याचे कारण नाही. शिवसेना चर्चा करत आहे. म्हणजेच काँग्रेस देखील चर्चा करत आहे.सर्वजण बसून चर्चा करतील आणि एक चांगला निर्णय झालेला दिसेल, असं अतुल लोंढे म्हणालेत.
9 तारखेला काँग्रेसच्या अलायन्स कमिटीची बैठक आहे. यात जागा वाटपावर व्यवस्थित चर्चा होईल. सर्व गोष्टी चर्चेतून सुटतील. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन 48 जागांची अॅडजेस्टमेंट होईल. भाजप तीन-चार जागेवर जरी वाचलं, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसमध्ये एक प्रक्रिया आहे त्यातून निर्णय होत असतात, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यावरही लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी दौऱ्यावरच असतात. त्यांना दुसरं काम काय आहे? ते कुठेतरी फॉरेन टूरवर असतात किंवा थंड हवेच्या ठिकाणी समुद्रकिनारी असतात. त्यानंतर कोण कोण आयलँड खरेदी करायला जातं, हे लक्षात येईल, असं लोंढे म्हणाले.
महिला पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप आठ महिला पोलिसांनी केला आहे. तसं पत्र महिला पोलीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. त्यावर अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला सुरक्षित नसतील तर या सरकारला लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहे. त्यांनी लवकर ॲक्शन घेतली पाहिजे. नागपूर शहरात 500 बलात्कार झाले. अबकी बार बहुत होगा महिलोंपे बलात्कार अशी परिस्थिती आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अतुल लोंढे यांनी व्यक्त केली.