नाशिकः नाशिककरांच्या (Nashik) मानगुटीवर बसलेले कोरोनाचे (Corona) भूत काही केल्या उतरायला तयार नाही. गेल्या दोन लाटांच्या प्रकोपांनी शहरवासीयांना हादरवून सोडले. त्यातही आरोग्य व्यवस्थेचा कमकुवतपणा समोर आला. ऑक्सिजन (Oxygen) सिलिंडर, इंजेक्शनसाठी दिवस-दिवस रांगा लावाव्या लागल्या. आता त्याच नाशिकमध्ये कोरोना बळींच्या गौडबंगालाने पुन्हा एकदा उचल खाल्लीय. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे 4105 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, कोरोना बळींच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानसाठी तब्बल 10 हजार 120 अर्ज प्राप्त झालेत. विशेष म्हणजे यातील 8 हजार 338 अर्ज वैद्यकीय विभागाने मंजूर केले आहेत. त्यामुळे आता सरकार दरबारच्या आकडीवारीनुसार येथील कोरोना बळींचा आकडा चक्क दुपटीवर म्हणजेच 8 हजार 338 वर जाऊन ठेपलाय. आता या मृत्यूमागील कारणांचा शोध वैद्यकीय विभागाने सुरू केल्याचे समजते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे. त्याअनुषंगाने अर्ज मागवण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे 4105 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर सानुग्रह अनुदानसाठी तब्बल 10 हजार 120 अर्ज प्राप्त झालेत. त्यातील 8 हजार 338 अर्ज वैद्यकीय विभागाने मंजूर केले आहेत. आता ही वाढलेली मृत्यू संख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरतेय.
कोरोनाच्या सानुग्रह अनुदानासाठी आलेल्या अर्जाची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या अर्जांची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. प्रशासनाने ऑनलाइन अर्ज मागवले होते. काही अर्ज ऑफलाइन आल्याचीही शक्यता आहे. शिवाय एकाच घरातील अनेक जणांनी अर्ज केले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कारणामुळे या साऱ्या अर्जांची बारकाईने चौकशी केली जाणार आहे. तरीही चक्क दुपटीवर दुबार अर्ज कसे काय असू शकतील, असा प्रश्नही विचारला जातोय. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने कोरोनाच्या बळींची संख्या दडवली काय, असा प्रश्न चर्चेत आला आहे.