येवलाः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या येवला येथे घरगुती वादातून एकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (suicide) केली आहे, तर संबंधिताची पत्नी गोळीबारात गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. किरण आनंद दुकळे असे मृताचे नाव आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, किरण दुकळे यांच्या घरात घरगुती कारणावरून सतत वाद होत असत. मात्र, या वादाने टोकाचे रूप धारण केले. त्यामुळे दुकळे यांनी स्वतः जवळच्या पिस्तुलातून गोळीबार सुरू केला. यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर किरण यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. सध्या किरण यांच्या पत्नीवर नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, प्रकाराने एकच खळबळ निर्माण झाली आहे. दुकळे यांच्याकडे पिस्तुल आले कोठून असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनीही (Police) त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
किरकिरीतून टोकाचे पाऊल
दुकळे यांनी घरगुतीच्या वादाच्या सततच्या किरकिरीतून टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे या कुरबुरी अनेक दिवसांपासून सुरू असतील. खरे तर जवळच्या नातेसंबंधात मनभेद निर्माण झाले की, प्रत्येक गोष्टीवर खटके उडतात. काही – काही वेळी संयम बाळगला तर अशा प्रसंगातून मार्ग काढता येतो. अनेकदा तर शब्दाला शब्द लागून त्याचे मोठ्या भांडणार रूपांतर होते. त्यातून असे टोकाचे पाऊल उचलले जाते. यात जर या क्षणी रागावर नियंत्रण मिळवण्यात दुकळे यशस्वी ठरले असते, तर असा प्रसंग उदभवलाच नसता.
घरगुती भांडणे वाढली
कोरोनाच्या काळानंतर घरगुती भांडणे आणि हिंसाचारात वाढ झाल्याचे समोर येत आहे. लॉकडाऊनमुळे साऱ्यांना दिवसभर एकाच घरात रहावे लागले. त्यामुळे अनेक कुटुंबात खटके उडायला सुरुवात झाली. पती-पत्नी दिवसभर एकत्र राहिल्याने त्यांच्यातही बेबनाव निर्माण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली. दुसऱ्याच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेपावरून ही भांडणे विकोपाला गेल्याचे समोर आले आहे.
इतर बातम्याः