मालेगावः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये (Malegaon) पूर्व वैमनस्यातून चक्क एका व्यक्तीचा हात तोडल्याचा प्रकार उघड झाला असून, जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. संशयित फरार झाला असून, पोलीस (Police) त्याच्या मागावर आहेत. मात्र, या अघोरी हल्ल्याने पोलिसही चक्रावून गेलेत. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारींमुळे मालेगाव सतत चर्चेत आहे. दिवाळीच्या सुमारास तर मालेगावमध्ये पेटलेल्या दंगलीने देश हादरला. त्यामुळे या संवेदनशील शहरात पोलिसांसमोर रोज एक आव्हान उभे राहताना दिसत आहे. मालेगावमधील पवारवाडीतील मेहवीनगर येथे दोन कुटुंबात पूर्व वैमनस्य आहे. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. हे प्रकरण थेट भांडणापर्यंत गेले. या भांडणांनी इतके टोक गाठले की, एका व्यक्तीने समोरच्याच्या मनगटावर शस्त्राचा वार करून हात तोडला. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. त्यात संशयिताने धूम ठोकली.
पंजा झाला निकामी…
हाताचा पंजाच निकामी झाला, तर कसे…हा विचार सुद्धा करवत नाही. मात्र, भांडण करताना बेभान झालेल्या व्यक्तीला याची जाण असेलच, हे सांगता येत नाही. राग भीक माग म्हणतो, अगदी तसेच मालेगावमध्ये झाले. समोरच्या व्यक्तीने केलेल्या शस्त्राच्या एका घावात दुसऱ्याचा पंजा तुटला. जखमी व्यक्तीवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फरार संशयिताचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पोलिसांची पथके संशयिताच्या मागावर आहेत. मात्र, झाल्या प्रकाराने परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. ही गुंडगिरी थांबवावी, अशी मागणी सामान्यांतून होत आहे.
राग ठेवा नियंत्रणात…
मालेगावमधील ही घटना सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणारी आहे. अनेकदा आपण किरकोळ कारणावरून हुज्जत घालतो. शब्दाला शब्द वाढत जातो. साध्या-साध्या आणि दुर्लक्ष करता येण्यासारख्या प्रश्वावरही पोटतिडकीने भांडतो. हा वाद विकोपाला गेला की, भल्या-भल्या सभ्य माणसांच्या हातून देखील रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. अनेकदा इतर ठिकाणचा राग भलत्याच ठिकाणी बाहेर पडतो. त्यामुळे सगळाच घोळ होतो. थोडा जरी संयम पाळला, तर बरेच काही आक्रित टाळले जाऊ शकते.