चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी नाशिक | 24 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. आरक्षणाची घोषणा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर राज्याचे ग्माविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, आरक्षण देईल तर हेच सरकार देईल. फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल, असं गिरीश महाजन म्हणालेत. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आश्वस्त केलं.
मनोज जरांगे यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. आम्ही न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली समितीचे वेगाने काम सुरु केलं आहे. मला वाटतं, त्यांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा. कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी कायदेशीर आधार द्यावा लागेल. अजूनही थोडा वेळ लागेल, असं मला वाटतंय.चर्चा ही सुरू राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल. पुन्हा उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही उपयुक्तता होणार नाही, असंही गिरीश महाजन म्हणालेत.
सरसकट आरक्षणाची काही आवश्यकता नाही. पण मराठवाड्यात त्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समिती अभ्यास करत आहे. अजून किती दिवस लागेल, हे मला सांगता येणार नाही. आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे. त्याचमुळे आमच्या सरकारच्या काळात मोर्चे निघत आहेत. सरकार त्याची दखल घेत आहे. पण याबाबतीत तोडगा काढायला थोडा वेळ लागेल, असं गिरीश महाजन म्हणाले.
मराठा आरक्षण मिळत नाही. तोवर नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यावर यातून लवकरच मार्ग निघेल. फार काही बंदी वगैरे याची गरज पडणार नाही, असंही महाजन म्हणालेत.
भाजपचे नेते निलेश राणे यांनी आपण राजकीय निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावर प्रश्न विचारला असता तुमच्या माध्यमातूनच मला हे कळतंय. मलाही आश्चर्य वाटलं की, त्यांनी असा निर्णय कसा घेतला?, असं गिरीश महाजन म्हणालेत.