नाशिकः नाशिक-सुरत (Surat) हे 176 किलोमीटरचे अंतर फक्त सव्वा तासात गाठणे शक्य करणाऱ्या ग्रीनफिल्ड (Greenfield)महामार्गासाठी ऑगस्टपासून जमीन खरेदी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये 996 हेक्टर जमिनीची खरेदी केली जाणार आहे. हैदराबादची आर्वी असोसिएटस आर्किटेक्चर डिझायनर कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम करत आहे. जिल्हा प्रशासनाने सध्या जमीन मोजणी सुरू केलीय. जुलै महिन्यापर्यंत हे काम चालणार असल्याचे समजते. त्यानंतर ऑगस्टमध्ये थेट जमीन खरेदी करून भूसंपादन केले जाणार आहे. मात्र, या जमिनीसाठी मोबदला कसा आणि किती मिळणार याची चर्चा सुरूय. रेडिरेकनरच्या दोन की चार पट पैसे मिळणार याची उत्सुकता आहे. शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळाला, तर भूसंपादनात अडथळा येणार नाही. अन्यथा हे काम रखडू शकते.
कुठे होणार भूसंपादन?
ग्रीनफिल्ड महामार्ग नाशिक, निफाड, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, सिन्नर या तालुक्यातील गावांमधून जाणार आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील सर्वाधिक 23 गावे आहेत. नाशिक तालुक्यातील आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव येथून जाईल. निफाड तालुक्यातील चेहेडी खुर्द, चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी गावातून हा महामार्ग जाईल. सुरगाणा तालुक्यातील बेंडवळ, बहुडा, दुधवळ, गहाळे, रक्षाभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ गावातून हा मार्ग जाईल.
महामार्गाचा फायदा काय?
ग्रीनफिल्ड महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे 1600 किलोमीटरचे अंतर 1270 किलोमीटवर येईल. त्यामुळे 350 किमीचा प्रवास कमी करावा लागेल. मोठ्या शहरातील प्रदूषण यामुळे कमी होईल. मुंबई, पुणे, सोलापूर येथील वाहतूक 50 टक्के घटेल. सध्या नाशिक ते सुरत दोन मार्गाने जाता येते. पहिला मार्ग नाशिक-दिंडोरी-सापुतारा. हे अंतर 240 किलोमीटर आहे. तर नाशिक-धरमपूर-सुरत हे अंतर 225 किमी आहे. सध्या या प्रवासासाठी पाच तासांचा वेळ लागतो.
कधी तयार होणार?
ग्रीनफील्ड महामार्ग पुढील तीन वर्षांत रस्ता तयार असेल. नाशिक जिल्ह्यात त्यासाठी 996 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. या मार्गाचे नाशिक जिल्ह्यातील अंतर हे 122 किलोमीटर असेल. ग्रीनफील्ड महामार्गामुळे सुरत, नगर, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई ही शहरे जोडली जातील. सोबतच सुरत-चेन्नई हे 1600 किमीचे अंतर 1250 किमीवर येईल. त्यातही म्हणजे नाशिक-सुरत अंतर फक्त 176 किमीवर येईल. त्यामुळे नाशिककर एकदम सुसाट सव्वा तासात सुरत गाठतील.
नाशिक-सोलापूर अंतरही कमी
राज्यात राक्षसभुवन (ता. सुरगाणा) येथे हा महामार्ग प्रवेश करेल. अक्कलकोट (ता. सोलापूर) येथे या महामार्गाचे राज्यातील शेवट असेल. हा महामार्ग सिन्नरमधील वावीत समृद्धी एक्स्प्रेसला ओलांडणार आहे. त्यासाठी सोलापूर, नाशिक, नगर जिल्ह्यात प्रकल्पाची उभारणी होणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गामुळे नाशिक ते सोलापूर हे अंतर चक्क 50 किलोमीटरने कमी होणार आहे.
राज्यात 5 हजार 142 गावांमध्ये राबवणार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना; कसा होणार शिवाराचा कायापालट?
उत्तर महाराष्ट्रातील बड्या रुग्णालयांना महावितरणचा दणका; थकबाकी न भरणाऱ्या हॉस्पिटलवर होणार कारवाई
नाशिकच्या प्राध्यापकांची कमाल, दुर्मिळ वनस्पतीच्या प्रजातीचा लावला शोध, काय होणार उपयोग?