शैलेश पुरोहित, इगतपुरी : दिवसाढवळ्या एका बिबट्याने (Leopard rescue) मानवी वस्तीत प्रवेश केल्यामुळे नागरिक एकदम भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे बिबट्या एका जनावरांच्या गोठ्यात लपून बसला होता. ही माहिती तिथल्या वस्तीतल्या लोकांना समजल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या कानावर घातली. वन विभागाचे अधिकारी (forest officer) घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्या परिसराची पाहणी केली आणि बिबट्या ताब्यात घेण्यासाठी एक आराखडा तयार केला. त्यावेळी गावकऱ्यांनी एका बाजूला बसून हा सगळा प्रकार पाहिला. बिबट्याला ताब्यात घेताना अनेकांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना (Igatpuri) घाम फुटला असल्याचं सांगितलं जात आहे.
इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे (गावठा ) येथील एका जनावरांच्या गोठ्यात नरभक्षक बिबट्या लपून बसला असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामस्थ भयभीत झाल्यानंतर मोबाईलवरुन एका ग्रामस्थाने वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांना सगळी माहिती सांगितली. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून बिबट्याला पकडण्यासाठी भाऊसाहेब राव यांनी उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार व इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस हे घटनास्थळी दाखल झाले.
रेस्क्यू टीम लीडर थोरात व सर्व रेस्क्यू टीमला व्यवस्थित मार्गदर्शन करून टीमचे विभाजन केले. आवश्यक असणारे साहित्य सोबत घेऊन शासकीय व खासगी वाहन घेऊन सर्व टीम बिबट्या लपून बसलेल्या जनावरांच्या गोठ्याच्या जागेवर दाखल झाल्या. ग्रामस्थांना याबाबत सविस्तर सूचना देऊन गोठ्यात दडून बसलेल्या बिबट्यापासून सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे तेथील सर्व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत गोठ्यात लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद केले. मात्र हे सर्व मॉकड्रील होते, हे माहित झाल्यावर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. याप्रसंगी सरपंच, पोलीस पाटील, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित राहिले होते. सर्व ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानले, त्याचबरोबर आनंद व्यक्त केला.