नाशिक : गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात सातत्याने चोरीच्या (Theft) घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन दिवसात तीन चोऱ्या झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. साईदत्त फार्मामध्ये चोरी झाली असून चोर चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाले असूनही अद्यापही चोरांना पकडण्यात पोलिसांना (Police) यश मिळाले नसल्यामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे. घराला कुलूप लावून बाहेर जाण्याची भीती सध्या शहरातील नागरिकांना वाटते आहे.
साईदत्त फार्मामध्ये चोरी झाल्यानंतर शहरात चोऱ्या होण्याचे सत्रच सुरू झाले. पटणी गल्लीत शशिकांत अंकाईकर यांच्या घराचे कुलूप तोडत कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. यामुळे पटणी गल्लीत भीतीचे वातावरण आहे. शहरात रविवार रात्री तिसऱ्या ठिकाणी गुजरवाडा परिसरात पुरुषोत्तम विश्वमभर कासार यांच्याही घरी चोरी झाली.
पुरुषोत्तम विश्वमभर कासार हे त्याच्या मुलाला भेटण्यासाठी नगर येथे गेले होते. त्यांच्या घराला कुलूप पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करीत जे सापडेल घेऊन गेले. तसेच साळी गल्ली येथील भालेराव यांची दुचाकी गाडी व घरातील रोख रक्कम घेऊनही चोर पसार झाले. सततच्या होणाऱ्या चोऱ्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले असून या चोरांचा शोध घेणे हे देखील पोलिसांपुठे मोठे आव्हान उभे राहिले आहे.