नाशिक : नायलॉन मांजामुळे गळा चिरुन मृत्यू झालेल्या नाशिकमधील महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. दुचाकीवरुन घरी जात असताना काल (सोमवारी) संध्याकाळी भारती जाधव यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नायलॉन मांजावर बंदीची मागणी पुन्हा जोर धरत आहे. (Nashik lady dies after throat cut by Nylon manja)
भारती जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जाधव यांच्या नातेवाईकांची गर्दी झाली आहे. शासनाकडून आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. पोलिसांनी कुटुंबीयांशी चर्चा करुन समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
46 वर्षीय भारती जाधव यांचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. भारती या नाशिकमधील सातपूर भागात असलेल्या आपल्या कार्यालयातून नेहमीप्रमाणे दुचाकीने घरी जात होत्या. त्यावेळी द्वारका पुलावर मांजाने गळा चिरल्यामुळे त्या जखमी झाल्या. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
नायलॉन मांजाला बंदी असतानाही सर्रासपणे मांजाचा वापर सुरु आहे. त्यामुळे नायलॉन मांजावरील कारवाई आता आणखी कठोर होणार आहे. नायलॉन मांजावरील बंदीचा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरीतील अपघाताच्या आठवणी ताज्या
पतंगाच्या मांजामुळे गळा चिरुन दोन वर्षांपूर्वी पिंपरीत डॉक्टर तरुणीला प्राण गमवावे लागले होते. पुण्याच्या कृपाली निकम यांचा पतंगाच्या मांजाने गळा चिरुन मृत्यू झाला होता. त्याआधी मीडिया कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचाही अशाचप्रकारे मांजाने गळा कापून मृत्यू झाला होता.
राष्ट्रीय हरित लवादाने काही वर्षांपूर्वीच चायनिज मांजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायलॉनच्या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र मकरसंक्रांतीच्या सणाच्या आसपास मांजाची विक्री पुन्हा सर्रास सुरु होते. या काळात असंख्य पक्षी मांजात अडकून जायबंदी होतात. तसंच पादचारी आणि दुचाकीस्वार यांना मांजाने चिरुन गंभीर दुखापती झाल्याचे प्रकारही समोर येतात. अनेक जणांना अशा घटनांमध्ये प्राणांनाही मुकावे लागले आहे.
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये इंडिगो कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, मायलेकाचा मृत्यू
नाशिकची गायिका गीता माळीचा अपघातात मृत्यू
(Nashik lady dies after throat cut by Nylon manja)