मालेगाव : मालेगाव (Malegaon) तालुक्यातील चिंचावड येथे जोरदार पाऊस सुरूयं. गिरणा नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गिरणा नदीवरील आघार व चिंचावड शिवारातील सिद्धेश्वर बंधारा (Siddheshwar Bandhara) लगतच्या आठ दहा शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर जमीन पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांसह जमिन वाहून गेली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. यंदा पाऊस (Rain) चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच पेरणी देखील करून घेतली होती.
पुराच्या पाण्यात पिक आणि जमीनही शेतकऱ्यांची वाहून गेलीयं. चिंचावड येथील दत्तात्रेय खैरनार यांच्या सह आठ दहा शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. ठेकेदाराकडून बंधाऱ्याचे काम वेळेत पुर्ण न झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बाजूने मातीचा भराव व संरक्षक भिंत न बांधल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसुल विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.
पुराच्या पाण्यात दोन्ही बाजूंनी किमान दहा ते पंधरा एकर जमीन पीकासह वाहून गेली. सुमारे एक ते दीड कोटी रूपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी अगोदरच पेरणी करून घेतली होती. तसेच पिकही चांगले आले होते. मात्र, या मुसळधार पावसाने आणि पुरामुळे चिंचावड येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.