नाशिकः नाशिक (Nashik) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली. अनंता सूर्यवंशी सकाळी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅकवर गेले होते. यावेळी जॉगिंग करताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका (Heart attack) आला. यातच त्यांचे निधन झाले. सूर्यवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून मनसेमध्ये (MNS) सक्रिय होते. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे निधन झाल्याने पक्षाने एक मोहरा गमावला आहे. याबद्दल सर्वच राजकीय पक्षांमधून हळहळ व्यक्त होत आहे. अनंता सूर्यवंशी यांचा स्वभाव मनमिळावू होता. साऱ्यांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा आग्रह असायचा. त्यांचा जनसंपर्कही मोठा होता. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक आणि इतर सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सुर्यवंशी यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ही मनाला चटका लावणारी आणि अतिशय दुःखद घटना आहे. त्यांच्याशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. अगदी आमच्या संकट काळात सुद्धा ते आमच्या सोबत होते. मितभाषी आणि सहृदय व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांना परिचित होते.
भुजबळ आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सूर्यवंशी यांनी नाशिक महानगरपालिकेत पंचवटी प्रभागातून नगरसेवक म्हणून देखील काम केले. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या निधनाने सूर्यवंशी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय सुर्यवंशी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.