चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 28 फेब्रुवारी 2024 : 2022 ला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमादारांसोबत बंड केलं. तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते शिंदेंसोबत गेले. आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारत शिंदे गटात जाणं पसंत केलं. बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक नेते एकामागोमाग एक शिंदे गटात सामील झाले. आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला एक खासदार पुन्हा ठाकरे परतण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात काही पक्षांतरं होतानाही दिसत आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते महायुतीत सामील होताना दिसत आहेत. अशातच आता शिंदे गटातील बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहे. कारण खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याची शक्यता आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे. त्याला कारण ठरलं आहे ते ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेला गौप्यस्फोट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत. हेमंत गोडसेंकडून नार्वेकर यांच्यामार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरु आहे, असा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला आहे. त्यानंतर गोडसे ठाकरे गटात येणार का?
हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्यही ते राहिले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचं सदस्य होत त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. 2014 ला ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2019 ला ते पुन्हा एकदा खासदार झाले. दरम्यान शिवसेनेत येण्याआधी ते मनसे पक्षाचे सदस्य होते. नाशिकच्या राजकारणात त्यांचं मोठं प्रस्थ आहे. त्यामुळे गोडसे जर ठाकरे गटात आले तर महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर ठाकरेंना मात्र बळ मिळण्याची शक्यता आहे.