नाशिकच्या धरणांमध्ये 40 दिवसांचा पाणीसाठा, आठवड्यातील ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

| Updated on: Jul 12, 2021 | 5:29 PM

मान्सूनच्या पावसानं नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारलीय. सध्या गंगापूर धरण समुहात नाशिक शहराला 40 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा धरणात शिल्लक आहे.

नाशिकच्या धरणांमध्ये 40 दिवसांचा पाणीसाठा, आठवड्यातील या दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी वाढले आहे.
Follow us on

नाशिक: मान्सूनच्या पावसानं नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारलीय. सध्या गंगापूर धरण समुहात नाशिक शहराला 40 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा धरणात शिल्लक आहे. येत्या आठवडा भरात पाऊस न पडल्यास शहरात दर बुधवारी संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवत पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौरांच्या दालनात झालेल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे. तर, जुने नाशिक भागात गढूळ पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असून शिवसेनेनं आंदोलन केलं आहे.

नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट

जून महिना संपून जुलै महिन्यातील 10 दिवस उलटले तरी पावसानं दडी मारल्यानं नाशिक शहरावरील पाणी कपातीचं संकट आलं आहे. नाशिककला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा राहिला आहे. जलंसपदा विभागानं देखील नाशिक महापालिकेला पाणी कपात करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. जलसंपदा विभागाच्या वतीनं दिलेल्या पत्रावर नाशिक महापालिकेनं निर्णय घेत बुधवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

जलंसपदा विभागाचं पालिकेला पत्र

गंगापूर धरणातील पाणी साठा गत वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं जलसंपदा विभागानं पालिकेला पाणी कपात करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. पाणी जपून वापरण्या बरोबरच अतिरिक्त पाणी वापरल्यास दंडात्मक दरात आकारणी करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कडूनही पालिका अधिकाऱ्यांना वेळीच पाणी कपातीचा निर्णय घेण्याचे आदेश यापूर्वीचं देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात

नाशिक जिल्ह्यात आज पासून जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिकमध्ये पावसाने यंदा चांगलीच ओढ दिली आहे..मात्र शेतकऱ्यांनी आता धोका पत्करून पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे.

गढूळ पाण्यावरुन सेना आक्रमक

जुने नाशिक परिसरात गढूळ पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अनेक घरांमध्ये गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.शिवसेनेच्या वतीने या विरोधात आंदोलन करण्यात आलं.जुन्या महापालिकेत शिवसैनिकांनी गढूळ पाण्याच्या बाटलीवर फडनवीसांचे स्टिकर लावून या बाटल्या अधिकाऱ्यांना भेट दिल्या..यावेळी नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

संबंधित बातम्या:

नाशिकवरील पाणी कपातीचं संकट गडद, जलसंपदा विभागाचं पालिकेला पत्र, अधिक पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

कोरोना लसींचा तुटवडा, नाशिककरांची निराशा, 2 केंद्रांवर कोवॅक्सिनचं लसीकरण, कोविशील्डचा साठा संपला

Nashik Municipal Corporation decided to water supply closed on Wednesday due to low rain in Gangapur Dam