नाशिक : पाणीपट्टी न भरणाऱ्यांना नाशिक महापालिका आता दणका देणार आहे. 25 हजार रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी असलेले 4 हजार 285 नळ कनेक्शन पालिका तोडणार आहे. 40 कोटी रुपये पाणीपट्टी थकल्याने ही कारवाई केली जाणार आहे.
पाणीपट्टी आणि घरपट्टी मिळून तब्बल 400 कोटी रुपयांची थकबाकी झाल्याने नाशिक महापालिकेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. 25 हजार रुपयांपेक्षा अधिक पाणीपट्टी थकित असलेले 4285 नळ कनेक्शन तोडण्याचा निर्णय नाशिक मनपाने घेतला आहे. नाशिक महापालिकेची जवळपास 40 कोटी रुपये पाणीपट्टी थकल्याची माहिती आहे.
नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा
नाशिक महापालिकेनं शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा जुलै महिन्यात दिला होता. कोरोना काळात घरपट्टी, पाणीपट्टी थकवल्याने मनपाच्या तिजोरीत मोठी घट आली आहे. आतापर्यंत महापालिकेची थकबाकी 400 कोटींपर्यंत गेली आहे. नाशिक महापालिकेचे पाणीपट्टीचे एकूण 20 हजार पेक्षा अधिक थकबाकीदार आहेत. त्यापैकी शहरात 7 हजार थकबाकीदार आहेत. थकबाकीदारांना 7 दिवसात थकीत पाणीपट्टी भरण्याचा अल्टीमेटम देत, ती न भरल्यास नळ कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला होता.
पहिल्या तिमाहीत 150 कोटींचा फटका
मार्च 2020 पासून सुरु झालेल्या कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशातील अनेक घटकांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. कोरोना काळात अनेक नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी थकवल्याने नाशिक महापालिकेच्या तिजोरीत मोठी घट आली आहे. नाशिक महापालिकेला पहिल्या तिमाहीत तब्बल 150 कोटी रुपयांची घट आलेली आहे. वर्षाकाठी नाशिक महापालिकेला 350 कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे. यामुळे धास्तावलेल्या नाशिक महापालिकेनं शहरातील तब्बल 7 हजार नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईकरांसाठी अभय योजना
दुसरीकडे, कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागलेल्या मुंबईतील नागरिकांचे पाणीपट्टी, वीजेचे बिल थकले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने अभय योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत पाणीपट्टी थकविणाऱ्या नागरिकांकडून 138 कोटींची वसुली करण्यात आली होती.
शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकली आहे. ही थकीत रक्कम वसूल व्हावी आणि नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी भरावी यासाठी प्रशासनाने अभय योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत दोन टक्के अतिरिक्त आकारणी शुल्क माफ केले जाते.
या योजनेअंतर्गत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत 56 हजार 964 जलजोडणीधारकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. या योजनेअंतर्गत जलजोडणी-धारकांकडून 138.19 कोटी रुपये कर पालिकेकडे जमा करण्यात आला होता. तर महानगरपालिकेद्वारे तब्बल 30.55 कोटी रुपयांची सूट जलजोडणीधारकांना देण्यात आली होती.
संबंधित बातम्या:
पाणीपट्टीसह घरपट्टी थकबाकीदार नाशिक महापालिकेच्या रडारवर, 400 कोटींच्या वसुलीचं आव्हान