नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडलीय. घरातील बाथरूममधील पाण्याच्या बादलीत पडून एका सहा महिन्याच्या बाळाचा (Baby) मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बंदावणे मळा परिसरात राहणाऱ्या भिकाजयसिंह यांचा लहान मुलगा श्रीरीश हा सकाळी उठल्यानंतर घरातील खोलीत असलेल्या बाथरुममध्ये गेला आणि त्यावेळी प्लास्टिकच्या बादलीत पडला. काही वेळाने घरातील लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी अत्यवस्थ अवस्थेत श्रीरीशला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सातपूर पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. आई-वडील झोपलेले असताना हा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आपल्या लहान मुलांची काळजी घेण्यात थोडीही हयगय केली, तर कधीही आणि काहीही होऊ शकते. थोडी दक्षता घेतली, तर असे प्रकार टाळताही येऊ शकतात.
भिकाजयसिंह यांचा मुलगा श्रीरीश सकाळी सात वाजता उठला. तो रडत होता. त्याला आईने दूध पाजले. त्यानंतर जागे झालेल्या भिकाजयसिंह आणि त्यांच्या पत्नी दोघांनाही डोळा लागला. श्रीरीश मात्र जागाच होता. त्याने घरात इकडे-तिकडे रांगणे सुरू केले. तो हळूहळू बाथरूमकडे गेला. बाथरूमध्ये एक पाण्याची बादली ठेवली होती. तिला धरून तो उभा टाकला. त्याने पाण्याशी खेळणे सुरू केले. त्यात तोल जाऊन तो बादलीत बुडाला. श्रीरीशचे आई-वडील जागे झाले तेव्हा त्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र, तो पाण्याच्या बादलीत पडल्याचे दिसले.
श्रीरीशच्या आई-वडिलांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या घटनेचा गंभीर परिणाम श्रीरीशच्या आईवर झालाय. तिने भयंकर आक्रोश केला. हे पाहून परिसरातील नागरिक आणि नातेवाईकही हेलावून गेले. ही घटनाच अशी विचित्र पद्धतीने घडली की, दोष द्यायचा तरी कोणाला, अशी हळहळ उपस्थित व्यक्त करत होते.