चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, नाशिक | 07 ऑक्टोबर 2023 : नाशिकच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. बचत गट आणि अंगणवाडी सेविका यांच्याबाबत सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच सध्या सरकारच्या वतीने सुरु असलेल्या विकासकामांवरही अजित पवार यांनी भाष्य केलंय. मागे काही कामांना स्थगिती होती. आता सगळ्या स्थगिती उठवल्या आहेत. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. बचत गट आणि अंगणवाडी सेविकांच्या बाबत लवकरच समाधानकारक निर्णय होईल, असा शब्द अजित पवार यांनी दिला.
मी देखील शेतकरी आहे. माझ्या वाटणीला वडिलोपार्जित जी जमीन आलीय. ती मी बारामतीत करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मला माहिती आहेत. महायुतीच्या काळात आम्ही अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा खाजगी सावकारी होती. परस्पर नावावर जमिनी करून घेतल्या होत्या. जिल्हा बँकेच्या बाबत चांगले निर्णय घेतोय, टप्प्याटप्प्याने अडचणी सोडवू, असं अजित पवार म्हणाले.
1100 कोटीची कामे केली आहे. पण मत मागायला येईल. तेव्हा 1500 कोटींची कामे झालेली असतील. मी तुम्हाला शब्द देतो. ओतूरचा प्रश्न सुद्धा निकाली निघेल. कारण नसताना बदनामी चालली आहे. कंत्राटी भरती बाबत बोलत आहे. काही लोक तरुणांची दिशाभूल करत आहे. नवीन भरती येईपर्यंत कंत्राटी भरती सुरु आहे. नर्स, शिक्षक रिटायर्ड झाल्यावर त्यांना काय सांगायचं. दीड लाखांची भरती होतेय. अनेक विभागांची भरती सुरु आहे. 1 हजार 585 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचाही निर्णय घेतला. अजूनही नागपूरचे हिवाळी अधिवेशन आहे. लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असं अजित पवार म्हणालेत.
आपली नाशिक जिल्हा बँक एक नंबर बँक होती. ही बँक कुणामुळे अडचणीत आली ती कुणामुळे आली. त्या खोलात मी जात नाही. मी सगळ्या आमदारांना बोलावून सांगितलं ही बँक आपल्याला अडचणीतून बाहेर काढायची आहे. राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतला पाहिजे. नाबार्डने पण पुढाकार घेतला पाहिजे. अडचणीत असलेली बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात.ती बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. सहकार खातं आपल्याकडे आहे. वसुली सुरू झाली की म्हणू नका दादा हे सुरू झालं आणि ते सुरू झालं… बाकी काळजी करू नका. कुणाचं नुकसान होणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी नाशिककरांना आश्वस्त केलं.