नाशिक / शैलेश पुरोहित : नाशिक मुंबई महामार्गावर तळेगाव शिवारात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास डस्टर कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने चालकासह दोन प्रवासी बचावले आहेत. कसारा घाटात गाडीच्या क्लचमध्ये बिघाड होऊन ब्रेक फेल झाला. यानंतर गाडीतून धूर निघाला. पण चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने गाडीतील तिघे जण सुखरुप बचावले आहेत. मात्र गाडी जळून खाक झाली आहे. इगतपुरी नगर परिषद आणि महामार्ग सुरक्षा पथक यांच्या अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्यानंतर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेचा अधिक तपास महामार्ग पोलीस पथक करीत आहे.
विलास पितळे हे आपल्या कारने सकाळी पाहुण्यांना घेऊन मुंबई विमानतळावर गेले होते. तेथून नाशिकला परतत असतानाच कसारा घाटात गाडीच्या क्लचमध्ये बिघाड झाला. यानंतर गाडीचा ब्रेक झाला आणि गाडीतून धूर निघू लागला. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी सर्व्हिस रोडवर घेऊन हॅन्ड ब्रेकच्या सहाय्याने नियंत्रण मिळवत निलकमल हॉटेलजवळ उभी केली. तोपर्यंत गाडीतून धूर निघायला सुरुवात झाली. चालकासह दोन प्रवाशांनी वाहनातून खाली उतरून प्रसंगावधान राखत बाहेर पडले.
पाणी आणून गाडीच्या बोनेटर मारले, मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि गाडीने पेट घेण्यास सुरुवात केली. काही वेळात संपूर्ण गाडीने डोळ्यादेखत पेट घेतला आणि गाडी जळून खाक झाली. या घटनेची माहिती माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची अग्निशमन दलाची गाडी पाचारण करीत वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. मग इगतपुरी नगर परिषद आणि महामार्ग सुरक्षा पथक यांच्या अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.