नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचं काम तुमच्या कष्टामुळे सुरू आहे. आज मुंबईचा उल्लेख औद्योगिक राजधानी म्हणून कुणी करत नाही. तर आर्थिक राजधानी म्हणून उल्लेख करतात असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. एकेकाळी मुंबई शहरात 110, 120 टेक्सटाइल मिल होत्या, मात्र आज गिरगावात चाळ, खोली दिसत नाहीत. उंचच उंच इमारती दिसतात. तसेच कापड गिरण्यांच्या आज कुठेच जुन्या चिमण्या दिसत नाही अशी खंतही शरद पवार यांनी आज व्यक्त केली. त्याच प्रमाणे आज घाम गाळणारा वर्गही कुठेच दिसत नसल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी आज मुंबईबरोबरच देशातील कष्टकरी माणसांचे जीवन किती हलाखीचे झाले आहे.ते सांगत औद्योगिकीकरणामुळे जनसामान्यांचे जीवनही बदलून गेल्याचे त्यानी सांगितेल. तर दुसरीकडे आज अनेक ठिकाणी सरकारी कामं बंद होत असल्याची खंतही त्यांनी आज व्यक्त केली.
हिंदू मजदूर संघाविषयी गौरवोद्गगार काढताना शरद पवार यांनी म्हटले की, तुमच्या संघटनेने सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडवण्यासाठी खबरदारी घेतली. त्याचमुळे जनसामान्यांसाठी आपली शक्ती मजबूत करायला हवी असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
देशात आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. देशातील आणि राज्यातील नागरिक बेरोजगारी, महागाई या ओझ्याखाली दबला गेला आहे.
राज्यातील शेतकरी कधी अवकाळी, गारपीट तर कधी पडलेल्या बाजारभावामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तरीही देशात आज धर्म आणि जाती यांच्यामुळे फूट पडत आहे.
त्याच बरोबर देशात आज महागाई, नोकरीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सध्याच्या काळात हे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता वापरली पाहिजे असा सल्लाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
राज्य आज संकटांचा सामना करत आहे तरीही आताचे सत्ताधारी कधी राम, कधी अयोध्या याचा वापर करत असल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.