नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये कोरोना (Corona) लसीकरणाचा (vaccination) वेग गेल्या दोन आठवड्यांत 3.24 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. शासनाने कोरोना महामारीचे सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोनापासून आपण स्वत: व इतरांनाही सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लसीकरणाचे शंभर टक्के उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कंबर कसलीय. आरोग्य यंत्रणेबरोबरच प्रशासकीय पातळीवरही वेळोवेळी बैठका घेवून लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन करून काम करण्यात येत आहे. यामुळेच जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या डोसमध्ये 1 लाख 86 हजार 668 तर दुसऱ्या डोसमध्ये 4 लाख 14 हजार 095 इतकी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
मालेगाव महापालिकेमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे तेथे अधिकाधिक प्रचार व प्रसार आणि लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी आठवड्याच्या दर मंगळवारी दुपारी चार वाजता सर्व तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक घेऊन आढावा घेण्यात येत आहे. या बैठकीत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनाही उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण अशा सर्व यंत्रणांचा समन्वय साधून सामूहिकरीत्या हे काम पूर्ण करण्याचे धनुष्य जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने उचलले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, चांदवड, कळवण, पेठ, देवळा, बागलाण, सुरगाणा या तालुक्यांमध्ये 90 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात 69.13 टक्के लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण करण्यात आला आहे. तसेच नाशिक ग्रामीण 74.10 टक्के, महापालिका क्षेत्रात 73.85 टक्के आणि मालेगाव महापालिका क्षेत्रात 22.99 टक्के इतके लसीकरण करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील 12 ते 14 वर्षे वयोगटांमध्ये 60 टक्के लसीकरण पूर्ण झालेय. राज्यामध्ये नाशिक जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. यामध्ये जिल्ह्यातील 2 लाख 21 हजार 842 एवढे विद्यार्थी असून त्यापैकी 1 लाख 33 हजार 284 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच 15 वर्षा वयोगटातील लसीकरणाला सुरुवात झाली असून, आता पर्यंत 87.86 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. तर या वयोगटातील नाशिक ग्रामीण मध्ये 90.07 टक्के तर महापालिका क्षेत्रात 92 टक्के आणि मालेगाव महापालिका क्षेत्रात 61.77 टक्के लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरणाच्या कामांमध्ये स्वदेश फाउंडेशन, जीविका हेल्थकेअर व केअर इंडिया या सामाजिक संस्थांनी प्रशासनाला एकूण 28 मोबाइल व्हॅन उपलब्ध करून दिल्याने दुर्गम भागामध्ये नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी यश मिळाले आहे. याबरोबरच मराठवाडा ग्रामीण विकास संस्था देखील समाज प्रबोधनामध्ये प्रशासनास चांगली साथ देत असल्याने या सर्वांचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आभारही मानले आहेत.