नाशिक : 01 सप्टेंबर 2023 : कांद्या निर्यातीवरी शुल्काचा प्रश्न मागच्या काही दिवसात चर्चेत होता. त्यानंतर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर ही खरेदी चालूही झाली. मात्र काल अचानकपणे कांद्याच्या दरात सव्वाशे रुपयांची घसरण झाली. त्यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आज मात्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नाफेडकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे दर आता पुर्ववत झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हायसं वाटत आहे.
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दोन लाख मॅट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून हा कांदा खरेदी केला जातोय. 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने हा कांदा खरेदी केला जाईल, असं सांगण्यात आलं. त्यानुसार 8 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला गेला. मात्र अचानकपणे कांद्याच्या दरात घसरण झाली.
काल गुरुवारी अचानक नाफेड ने कांद्याचे दर कमी करत 2 हजार 274 रुपये दराने खरेदी सुरु झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. tv9 मराठी ने सर्वात प्रथम ही बातमी दाखवली. त्यानंतर आता नाफेडने 2 हजार 410 रुपये 75 पैसे दर जाहीर केला. आता या दराने नाफेड कांदा खरेदी सुरु केली आहे.
आज लासलगावला नाफेडच्या केंद्रावर 8 वाहनातून आलेला 200 क्विंटल हून अधिकाचा कांदा 2410 रुपये 75 पैसे दराने खरेदी करण्यात आला आहे. आज अचानक आता केंद्र चालकांसाठी नाफेडने नवीन नियम जाहीर केला आहे. खरेदी केलेला कांदा हा देशांतर्गत न पाठवता तो कांदा आता साठवणूक केला जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह केंद्र चालकांवरील तणावही वाढणार आहे. त्यामुळे दररोज नवनवीन नियम लादू नये अशी मागणी केली जात आहे.
नाफेडकडून करण्यात येणाऱ्या कांद्याच्या दरात काल मोठी घसरण झाली. 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी केला जात होता. 125 रुपये 13 पैशांनी या दरात घसरण झाली. काल 2 हजार 274 रुपये 83 पैसे दराने कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी खेच केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना फोन केला. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. आज मात्र हा दर पुर्वपदावर आला आहे. 2 हजार 410 रुपये 75 दर कांद्याला मिळाला आहे.