नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून शहरातील सर्व प्रभागात प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील क्रिकेट खेळणाऱ्या होतकरू तरुणांना क्रीडा (Sport) क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रभागात टर्फ क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. खरे तर शहरात योग्य क्षमता असलेले अनेक खेळाडू आहेत. त्यांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून नाशिकचे नावलौकिक वाढवावे, अशी अपेक्षा असते. मात्र, या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता म्हणाव्या तशा स्पर्धा होत नाहीत. हीच बाब हेरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भर उन्हाळ्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इतर पक्षही असे नाना उपक्रम या निमित्ताने राबवू शकतात. त्यानिमित्ताने प्रचार आणि स्पर्धा दोन्हीचा योग जुळून येऊ शकतो.
कधी होणार स्पर्धा?
नाशिक शहरातील सहा विभागात प्रभागनिहाय टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ रविवारी 20 मार्च रोजी ग्रीन फिल्ड टर्फ, पंचवटी येथून होणार आहे. प्रभाग प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक टीमला सन्मानचिन्ह व खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज व विजेत्या टीमला आकर्षक परितोषिक वितरण करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
निवडणुकीच्या तोंडावर
नाशिक महापालिकेची निवडणूक पुढील काही महिन्यांमध्ये होतेय. सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यात पुन्हा एकदा प्रभाग रचना होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडील इच्छुकांना निवडणुकीची तयारी करण्याची अजून एक संधी मिळाली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या स्पर्धा होत आहेत.
प्रभाग प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक टीमला सन्मानचिन्ह व खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज व विजेत्या टीमला आकर्षक परितोषिक देत गौरविण्यात येणार आहे.
– अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस