मालेगावः ऐन उन्हाळ्यात नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये घरोघरी पाण्याचा (Water) ठणठणाट आहे, तर रस्त्यावर महापूर दाटलाय. जलवाहिनी (Pipeline) फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. जुना आग्रा रोडवरील रस्त्याचे काम सुरू असताना पाइपलाइन फुटली आणि पुरवठा विस्कळीत झाला. खरे तर शहराचा पाणीपुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी. येथून जास्त दाबाने पुरवठा सुरू असतो. मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीचा एक फटका जलवाहिनीला बसला आणि रस्त्यावर उंचच उंच पाण्याचे फवारे उडाले. कितीतरी वेळ प्रचंड दाबाने पाण्याचा निचरा सुरू होता. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले. रस्त्यावर तर दुथडी भरून नदीच वाहतेय, असे चित्र होते. मात्र, आता दुरुस्ती होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. विशेष म्हणजे रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या महिन्यातही जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मालेगावकरांना पाण्यासाठी वणवण करायची पाळी येतेय.
निवडणुकीच्या तोंडावर कामे जोरात
मालेगावमध्ये सध्या ठिकठिकाणी रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. महापालिकेची निवडणूक तोंडावर आलीय. त्यात ओबीसी आरक्षणामुळे ही निवडणूक तीन महिने पुढे ढकलली गेलीय. मात्र, तत्पूर्वी शहरातील रस्त्यांची ठिकाठिकाणी कामे सुरू आहेत. ही कामे करताना योग्य ती खरबदारी घेतली जात नाही. त्याचा फटका शहरवासीयांना बसतोय. वारंवार जलवाहिनी फुटतेय. त्यामुळे नागरिकांमध्ये पराकोटीचा संताप आहे.
यंदा पाऊस होऊनही…
विशेष म्हणजे यंदा जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हाल केले. खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील नदी, विहिरी सध्या तुडूंब आहेत. बहुतांश ठिकाणी यंदा पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे चित्र आहे. मात्र, कृत्रिम अडचणींमुळे पुन्हा एकदा अनेक ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. थोडी जरी दक्षता घेतली तरी, अशा चुका टाळता येऊ शकतात. त्यामुळे रस्त्याची कामे लक्ष देऊन करावी. महिन्यातून दोनदा आणि तीनदा जलवाहिनी फुटली, तर या कामाचा उपयोग काय, असा सवाल होत आहे.
मालेगावमध्ये जलवाहिनी फुटल्याने पाणीबाणी…! pic.twitter.com/Au8xbU7njM
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 16, 2022
इतर बातम्याः