चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 08 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं विधान केलं आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे. आंबेडकरी विचारांची जनता कोणत्याही परिस्थितीत संविधानाची नासधूस करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना मत देणार नाही. प्रकाश आंबेडकर यांचा देखील हाच विचार आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल. महाविकास आघाडीत एक मत नक्की आहे. अकोला ही जागा परंपरेनुसार प्रकाशजी लढतात, त्यांनीच ती जागा लढावी, असं संजय राऊत म्हणालेत.
मुंबईच्या चर्चा मुंबईत होतात. पण काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत आहेत. त्यांना एकेक जागेसाठी दिल्लीत जावं लागतं. त्यांची सोय आम्ही पाहत आहोत. शिंदे गटाचे, अजित पवार गटाचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यांना अमित शाह, जे पी नड्डा यांना भेटावे लागतं. आम्हाला मुंबईत बसायचं आहे, ही काँग्रेसची सोय आहे. आमची सोय नाही. म्हणून दिल्लीत जाऊन चर्चा करू, असं संजय राऊतांनी म्हटलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा होता. आताच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला तो पट्टा नाहीये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मानेचा पट्टा हा एक आजार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीच्या पट्टा आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. न्यायव्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहचली आहे? राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले आणि अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना जाऊन भेटले.न्यायमूर्ती ज्यांना न्याय करायचा आहे, ते आरोपीला जाऊन भेटले. म्हणून आम्ही म्हणतो संविधान धोक्यात आहे… जाऊन भेटणं, चहापाणी करणं आणि हसत हसत बाहेर येणं, ही या देशाची सध्याची अवस्था आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.